लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: खाणी बंद करण्यासाठी कटकारस्थानाबाबत इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांनी केलेल्या आरोपांना अजूनपर्यंत कोणीच का उत्तर दिलेले नाही ? हे आरोप खरे मानावेत का, असा प्रश्न समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत त्यांनी विरियातो यांची व्हायरल ऑडिओ क्लीपही वाजवून दाखवली. या ऑडियो क्लीपमध्ये करण्यात आलेल्या आरोपानुसार त्यावेळी मंत्री ज्योकीम आलेमाव, विजय सरदेसाई यांनीच पर्यावरणप्रेमी क्लॉड आल्वारिस यांना त्यावेळी सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी त्यांनीच पुढे काढले व खाणी बंदचा आदेश कोर्टाकडून आणला. फळदेसाई म्हणाले की, 'विरियातो यांनी अजून या क्लीपमधील आवाज आपला नाही, असे म्हटलेले नाही. कटकारस्थानासाठी ज्यांच्या घरी बैठक झाली असा आरोप केला आहे ते गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनीही अजून काही स्पष्टीकरण दिलेले नाही. काँग्रेसचे माजी मंत्री ज्योकीम आलेमाव यांच्याकडूनही खुलासा झालेला नाही.
पंतप्रधान मोदी गोव्याबद्दल काही बोलले नाहीत, या विरोधकांच्या टीकेचा समाचार घेताना प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठी गर्दी पाहून काँग्रेस भयभीत झाला आहे. झुवारीवरील नवीन पुलापासून मोपा विमानतळापर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख मोदीजींनी केला.
कोविडकाळात पर्यटनस्थळ म्हणून गोव्याला प्राधान्यक्रमे लस उपलब्ध केली. काँग्रेसची दुटप्पी भूमिकाही त्यांनी उघडी पाडली.' आरती बांदोडकर यांनी मोदींच्या सभेला लोकांनी उपस्थिती लावून सभा यशस्वी केली. जनतेने मोदींप्रती विश्वास दाखवला आहे.