- वासुदेव पागी
पणजीः मुंबईहून आपल्या घरी जाण्यास निघालेला केरळी युवक पुढे ट्रेन नसल्यामुळे गोव्यातच अडकून पडला. अडलेल्यांना मदत करणे हे आपले गोंयकारपण, परंतु त्याला मारहाण करण्यापासून त्याचा मोबाईल व पैसे काढून घेण्यापर्यंतची अमानूषता त्याच्या पदरी पडली. मात्र राज्याच्या सीमेवरील लोलये वासियांकडून मिळालेल्या प्रेमामुळे तो भाउक झाला.
या युवकाचे नाव ऊन्नीकृष्णन असे असून तो केरळचा आहे. मुंबईला तो गेला होता. तेथून ट्रेन पकडून तो केरळला जायला निघाला होता. परंतु ट्रेन मडगावच्या पुढे गेली नाही. तसेच नंतर रेल्वेसेवाही बंद करण्यात आल्यामुळे तो तिथेच अडकून पडला. मडगाव येथे तो 20 दिवस राहिला. तेथून तो चालत कारवारच्या दिशेने निघाला. वाटेत त्याला काही लोकांकडून मारहाण करण्यात आली. तसेच त्याचे पैसे व मोबाईल ही काढून घेण्यात आला.
त्याही परिस्थितीत तो चालत राहिला. काणकोण तालुक्यातील लोलये गावात पोहोचला. तेथील काही लोकांनी त्याला अडवून त्याची विचारपूस केली. त्याला मल्याळम शिवाय इतर भाषा फारच अल्प येत असल्यामुळे त्याच्याशी संवाद करणेही कठीण होत होते. तो बराच दिवस उपाशीच होता असे आढळून आले. स्थानिक माजी सरपंच अजय लोलयेकर व राजेश नाईक, स्थानिक श्री दामोदर विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र आमशेकर आणि शिक्षक अनिल कामत यांनी त्याची काही खाण्यापीण्याची व्यवस्था केली. त्याला थोडे पैसेही दिले व नंतर पोलीसांना माहिती देवून त्यांच्या स्वाधीन केले. गोव्यातील सर्वच माणसे लोलयेवासियांसारखी असती तर त्या बिचाऱ्याला हे हाल सोसावे लागले नसते असे त्याला नेण्यासाठी आलेले पोलीसही बोलून गेले. त्याची निवारा घरात व्यवस्था करण्यात येणार असल्याची पोलीसांनी माहिती दिली.