मडगाव : गोव्यात महिलांवर अत्याचार वाढत आहेत परंतु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यावर का बोलत नाहीत असा प्रश्न विचारत, काँग्रेस नेत्या व पक्षाच्या बाणावली मतदारसंघाच्या जिल्हा पंचायत उमेदवार रॉयला फर्नांडिस यांनी डॉ. सावंत यांच्या कडुन चांदर येथे एका तरुणीवर दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्यावर कोणतीच प्रतिक्रीया का आली नाही याबद्दल मुख्यमंत्र्याना जाब विचारला आहे.
आपण गोव्याचे मुख्यमंत्री आहात व राज्यातील प्रत्येक नागरीकाचे रक्षण करणे हे आपल्या सरकारचे कर्तव्य आहे. गिरदोली- चांदर येथे एका तरुण मुलीला दिवसा रस्त्यात अडवुन तिला जबरदस्तीने जंतुनाशाक पाजले जाते. त्यावर मुख्यमंत्री साधे ट्विट वा भाष्य करीत नाहीत तसेच चौकशीचे आदेशही देत नाहीत हे अत्यंत दु्र्देवी आहे. महिलांवरील अत्याचारांबद्दल सरकारची अनास्था यावरुन दिसते असे रॉयला फर्नांडिस यांनी म्हटले आहे.
पर्वरी येथे एका व्यक्तिला वाटेत अडवुन त्याला जीवंत जाळण्याचा प्रकार घडला त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट केले होते. त्या ट्विटला उत्तर देताना काँग्रेस नेत्या रॉयला फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्यांना महिलांवरील अत्याचारां बद्दल जाब विचारला आहे. पर्वरी घटनेतील मरण पावलेल्या माणसाच्या कुटूंबियांप्रती सहवेदना व्यक्त करीत फर्नांडिस यांनी सर्वांना योग्य संरक्षण देणे हे सरकराचे कर्तव्य असल्याचे सांगत, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन दिली आहे.
चांदर येथील घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कोणतेच ट्विट वा भाष्य केले नव्हते असे सांगुन, मुख्यमंत्र्यांची ही वृत्ती धक्कादायक असल्याचे फर्नांडिस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री डॉ. सांवत यांच्याकडे आज गृह खात्याचा ताबा आहे. गोव्यातील जनतेला योग्य सुरक्षा पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे पर्वरीतील घटनेवर भाष्य करणारे मुख्यमंत्री चांदरच्या घटनेवर गप्प राहतात यावरुन गोवा सरकार महिलांचे शोषण करण्याचे भाजपचे धोरण राबवीत आहे का असा प्रश्न निर्माण होतो असे र फर्नांडिस यांनी म्हटले आहे.
गिरदोली- चांदर येथील तरुणीवरील हल्ल्याचा तपास जलदगती यंत्रणेमार्फत केला जावा व हल्लेखोरांना पोलिसांनी ताबडतोब अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आज गोव्यात महिला घरा बाहेर पडण्यास घाबरत असुन, त्यांना असुरक्षित वाटत आहे असा दावा त्यांनी केला आहे.