लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी आपला गोवा दौरा ऐनवेळी रद्द केल्याच्या विषयावरुन काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केलेल्या टीकेचा प्रदेश भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी निषेध केला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चोडणकर यांना दक्षिण गोव्याची तिकीट देण्यास नकार दिल्यापासून ते चर्चेत राहण्यासाठी निराधार आरोप करीत आहेत. त्यातूनच त्यांनी नड्डा यांच्यावर टीका केली आहे' असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावल्यानेच नड्डा येऊ शकले नाहीत.
या बैठकीत युनिफॉर्म पेन्शन योजनेसह विविध महत्त्वाचे निर्णय झाले, असे वेर्णेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. वेर्णेकर यांनी सांगितले की, 'जे. पी नड्डा यांनी आपला गोवा दौरा रद्द केल्यावर टीका करणाऱ्या गिरीश चोडणकर यांनी अगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गोव्यात का आली नाही? हे सांगावे. राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार गोव्यात का केला नाही?, गोव्यातील काँग्रेस नेतृत्व भ्रष्ट असल्याचे समजल्यानेच राहुल यांनी गोव्यात येण्याचे टाळले का ? याचे चोडणकर यांनी आगोदर उत्तरे द्यावीत, अशी मागणी वेर्णेकर यांनी केली.
मोदी, शहा यांनाच गोव्याविषयी प्रेम
वेर्णेकर यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांचे गोवा प्रेम हे केवळ येथील नैसर्गिक सुंदरता व ठराविक प्रजातींच्या कुत्र्यांसाठी आहे. गोव्याच्या काँग्रेस नेत्यांबाबत त्यांच्या मनात काहीच नाही. उलट राहुल गांधींपेक्षा पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अधिक गोवा दौरे केले आहेत. यावरून केंद्रीय भाजप नेतृत्वामध्ये गोव्याचे महत्त्व दिसून येते. त्यामुळे चोडणकर यांनी टीका करण्याएवजी काँग्रेसच्या अंतर्गत कार्यप्रणालीवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही वेर्णेकर यांनी केले.