लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यातील महत्त्वाच्या मोठ्या पुलांना भाऊसाहेबांचे किंवा पर्रीकर यांचे नाव देता आले असते तेही भाजप सरकारला जमले नाही. भाजप सरकारने कूळ-मुंडकार कायद्याची अंमलबजावणीही केली नाही. शिवाय राज्यातील जमिनीचे रक्षण करण्यातही ते अपयशी ठरले आहेत. भाजपकडून फक्त गोमंतकीयांची दिशाभूल केली जाते. म्हादईप्रकरणी राजीनामा देतो, म्हणणारे श्रीपाद नाईक ते धाडस करू शकले नाहीत, अशी टीका इंडिया आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप यांनी माशेलमधील जाहीर सभेत केली.
यावेळी काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर, तृणमूलचे समील वळवईकर, आमदार कार्लस फेरेरा, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गुरू कोरगावर, रामराव रमाकांत खलप वाघ, कांता गावडे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, अमरनाथ पणजीकर, एम. के. शेख, रामकृष्ण जल्मी व्यासपीठावर उपस्थित होते.
लोकसभेत श्रीपाद नाईक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही ज्येष्ठ असूनही गेल्या अनेक वर्षांत गोव्याच्या विकासाच्या संदर्भात किंवा गोव्याला सतावणाऱ्या प्रश्नासंदर्भात कोणत्याही मुद्द्यावर चर्चा केलेली दिसत नाही. इथल्या ओबीसी, एसटींचा विचार केला नाही. राजकीय आरक्षणही देणे शक्य आहे. पण भाजपने काहीच केले नाही, अशी टीका खलप यांनी केली.
दिगंबर कामतांसह काँग्रेस आमदारांनी मंदिरात जाऊन शपथ घेतली होती. त्या फुटिरांना भाजपने आपल्या पक्षात घेतले. देवदेवता, हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्यांनी तडजोड केली. याचा अर्थ ते देवदेवतांना मानत नसावेत. तसेच माध्यम प्रश्नावर मंदिरात गाऱ्हाणी घालणाऱ्यांनीही नंतर घूमजाव केले आणि पूर्वीच्या सरकारचे भाषा धोरण आजही सुरू ठेवले आहे, असे चोडणकर यावेळी बोलताना म्हणाले.