लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात पल्लवी धेंपे यांच्या पराभवाच्या धक्क्यातून भाजप सावरलेला नाही. दिगंबर कामत, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, सुदिन ढवळीकर, आलेक्स सिक्वेरा यांच्यासारखे बडे नेते सोबत असूनही पल्लवी का हरल्या? याची कारणमीमांसा सुरू झालेली आहे. फुटीर आमदारही मते आणण्यास कमी पडले.
सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसमधून फुटून भाजपात आलेले दक्षिणेतील आमदारांची पल्लवी यांना जास्तीत जास्त मते मिळवून देणे खरे तर कसोटी होती. परंतु याबाबतीत मडगावात दिगंबर कामत, नुवेत खुद्द मंत्री आलेक्स सिक्वेरा कमी पडले, मुरगावमध्ये २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे तत्कालीन उमेदवार नरेंद्र सावईकर यांना ९,२३६ मते मिळाली होती. यावेळी पल्लवी यांना ८,२६९ मते मिळाली. संकल्प आमोणकर काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये आले त्यामुळे मते आणखी वाढतील, अशी अपेक्षा असता फासे उलटे पडले.
मडगावमधून दिगंबर कामत यांच्याकडून मतांची मोठी अपेक्षा भाजपला होती. तिथे २०१९ मध्ये ९,०४६ मते भाजपला मिळाली होती आता ११,४७४ मते मिळाली. दिगंबर यांनी जिवाचे रान केले होते. तसेच पल्लवी यांचे माहेर खुद्द मडगावमध्ये आहे, त्यामुळे त्यांचे हे 'होम ग्राउंड' मानून भाजपच्या नेत्यांनीही येथे मोठ्या मताधिक्याची अपेक्षा ठेवली होती. परंतु ती काही पूर्ण होऊ शकली नाही.
नुवेचे फुटीर आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद दिले. त्यामुळे भाजपची मते येथे वाढायला हवी होती. २०१९ च्या निवडणुकीत सावईकर यांना येथे २,५२५ मते मिळाली होती. भाजपची पूर्वी होती तेवढीच मते मिळाल्याने मंत्री सिक्वेरा यांच्या बाबतीत भाजपची घोर निराशा झाली. फातोर्डा मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपला १०,०५८ मते प्राप्त झाली होती. यावेळी ती कमी होऊन ९८८१ मते मिळाली.
शिरोडा मतदारसंघात सुभाष शिरोडकर हे मंत्री असूनही अपेक्षित मताधिक्य भाजपला मिळाले नाही. २०१९ च्या निवडणुकीत सावईकर यांना १४,५४५ मते मिळाली होती, यावेळी मात्र २०२१ ने ती कमी झाली व पल्लवी यांना १२,५२४ मते मिळाली. मंत्री रवी नाईक यांच्या फोंडा मतदारसंघात केवळ एक हजार मतांची आघाडी भाजपला मिळू शकली तर सुदिन ढवळीकर यांच्या मडकई मतदारसंघात ४,०४१ मते यावेळी भाजपला जास्त मिळाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी मगोप भाजपसोबत नव्हता.
सावंत सरकारला बाहेरून पाठिबा दिलेले कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड तसेच कुठ्ठाळीचे अपक्ष आमदार आंतोन वास हेही अपेक्षेएवढी मते देऊ शकले नाहीत. कुडतरीत भाजपची स्वतःची अशी ५ हजार मते आहेत तेवढीच पल्लवींना मिळाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिगंबर कामत यांनी तत्कालीन उमेदवार फ्रान्सिस सादिन यांना २ हजारांहून अधिक मतांची लीड दिली होती. यावेळी मात्र ते ही मते भाजपकडे वळवू शकले नाहीत. आमदार निलेश काब्राल यांच्या कुडचडेतही भाजपची मते स्थिर राहिली. २०१९ साली ११,३६७ मते सावईकर यांना मिळाली होती. पल्लवी याना ११,३०० मते मिळाली.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदार वेगळा विचार करीत असतात. आम्ही पल्लवी धेपे यांच्या विजयासांठी जोरदार प्रयत्न केले. नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी रात्रदिवस काम केले. मात्र, मतदारांच्या मनात वेगळेच होते. - दिगंबर कामत, आमदार.
नावेलीतील ख्रिस्ती व मुस्लीम धर्मियांची मते काँग्रेसच्या पारड्यात पडली. गत विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांमध्ये झालेल्या मत विभागणीमुळे भाजपला लाभ झालेला. मात्र लोकसभेत पुनरावृत्ती झाली नाही. आम्हाला आणखी जास्त काम करावे लागेल. - उल्हास तुयेकर, आमदार