पणजी : मनोहर पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्री होते, तेव्हा फ्रेंच राफेल जेट विमानांच्या तोडीची सुखोई एसयू-३0 एमके वन ही तुलनेत स्वस्तातील विमाने खरेदी करण्यास अनुकूल असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महागडी विमाने खरेदी करण्यासाठी व्यवहार का केले, असा प्रश्न गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत खलप म्हणाले की, ‘राफेल प्रकरण पॅरिस, दिल्ली आणि गोवा अशा त्रिकोणात फिरते आहे आणि सध्या गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेले पर्रीकर यांनीही या वादग्रस्त व्यवहारांबाबत उत्तर द्यायला हवे. २0१५ साली राज्यसभेत पर्रीकर म्हणाले होते की, ‘१२६ विमाने खरेदी करण्याचा करार मागे घेतला जात आहे आणि त्याऐवजी ३६ विमाने खरेदी केली जातील व त्यासाठी वाटाघाटी चालू आहेत. त्याआधी फेब्रुवारी २0१४ मध्ये पर्रीकर यांनी असे म्हटले होते की, राफेल विमानांच्या तोडीची असलेली सुखोई विमाने खरेदी करणे संयुक्तिक ठरेल कारण त्यांची किंमतही कमी आहे.’ खलप यांनी ही आठवण करुन देताना असेही नमूद केले की, गेले काही महिने गंभीर आजाराने त्रस्त असलेले पर्रीकर यांनी रविवारी मांडवी नदीवरील तिस-या पुलाला भेट देऊन बांधकामाचा आढावा घेतला. पर्रीकर हे आता चालत, फिरत आहेत त्यामुळे आता त्यांनी राफेल व्यवहारांवर अधिक उजेड टाकावा.
खलप यांनी असा आरोप केला की, या प्रकरणात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे खोटारडेपणा केलेला आहे. राफेल प्रकरणाचे रहस्य या त्रिकोणातच दडले आहे. या प्रकरणी संसदेत चर्चा घडवून आणण्याची तयारी सत्ताधा-यांनी दाखवली आहे. परंतु चर्चेने काही साध्य होणार नाही. दोनच पर्याय आहेत, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी किंवा संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नासोल आणि अंबानी यांच्यात अशी काय गुप्त चर्चा झाली, असा सवालही खलप यांनी केला आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.