वासुदेव पागी, पणजीः विद्यालयात दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह आहारात विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी प्रत्येक दिवशी वेगवेगळा आहार दिला जात असल्याचे मुख्यमंत्री विधानसभेत सांगत होते. परंतु डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी विद्यालयात दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह आहाराचे आठवड्याचे वेळापत्रक वाचून दाखविले. त्यात समान प्रकारचा आहार पुन्हा-पुन्हा दिला जात होता. त्यात चपाती, बटाटा आणि टमाट्याची भाजी कायम होती. केवळ दोन दिवस पुलाव मिळत आहे. मग यात वैविध्य कसे काय? असा प्रश्न आमदार डॉ. शेट्ये यांनी केला.
मध्यान्ह आहार तज्ज्ञांच्या सूचनेनुसारच जर दिला जात असेल तर हे वेळापत्रक काय सांगते? असा प्रश्न डॉ. शेट्ये यांनी केला. आहार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आहाराचे वेळापत्रक ठरविण्यात आले असेल. तर त्याची अंमलबजावणीही तशीच होईल, याकडे शिक्षण खात्याने लक्ष ठेवावे अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याविषयी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ते वेळापत्रक सबंधित विद्यालयाने विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार केले असावे. परंतु त्याकडे लक्ष्य दिले जाईल. केवळ विद्यार्थ्यांना आवडते म्हणून आहार बदलणे हा निकष होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. आहाराच्या दर्जाच्या बाबतीत सुधारणा करा, अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली.
अक्षयपात्रामुळे स्वयंसहाय्य गटांना वगळणार नाही!
अक्षयपात्र या संस्थेला शिक्षण खात्याने मध्यान्ह आहार बनविण्याचे कंत्राट दिले असल्यामुळे सध्या ज्या महिला मध्यान्ह आहार पुरवत आहेत, त्यांच्याकडून रोजगार हिसकावून घेला जाईल काय? असा प्रश्न डॉ. शेट्ये यांनी केला. परंतु त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अक्षयपात्र ही संस्था कुणाचा रोजगार हिरावून नेण्यासाठी आणलेली नाही. आक्षयपात्र ही स्वयंसेवी संस्था असून सकस आहार देण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. तसेच ती नफा करणारी संस्था नाही. अक्षयपात्राला नवीन कंत्राटे दिली जाऊ शकतात, परंतु सध्या आहार देत असलेल्या संस्थांकडून काढून घेऊन अक्षयपात्राला दिला जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.