गोवा आणि शेजारील महाराष्ट्राचा सिंधुदुर्ग जिल्हा व कर्नाटकचा कारवार भाग या तीन ठिकाणी मिळून वार्षिक एक कोटीहून अधिक पर्यटक भेट देत असतात. यात अर्थातच देशी पर्यटकांची संख्या ही जास्त म्हणजे ५० लाखांहून अधिक असते. पर्यटन व्यवसाय हा विशेषत्वाने कोकणपट्टीत अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी राज्याच्या अन्य भागात, खासकरून विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्येही पर्यटन हे स्थानिकांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन बनले आहे. कोकणपट्टीत खाण धंद्याने कधीच मान टाकली आहे. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण नगण्य असल्याने पर्यटन व्यवसायाचे चहुबाजूंनी स्वागत केले जाते. अर्धशिक्षित आणि शिक्षित भूमिपुत्रांना पर्यटन क्षेत्रातच जास्त रोजगार संधी उपलब्ध होत असल्याचे गोवा राज्यात आणि सिंधुदुर्ग व कारवारच्या भागात अनुभवास येते. अशावेळी कोटी-दीड कोटी पर्यटकांचे स्वागत करणे स्थानिकांना आवडते.
'अतिथी देवो भव' ही आपली संस्कृती आहेच. मात्र पर्यटकांनी अधिक जबाबदार पद्धतीने वागणे, मनावर ताबा ठेवणे व सुसंस्कृत वर्तनाचा अनुभव देणे गरजेचे झाले आहे. गोवा व सिंधुदुर्गमध्ये अलीकडे अधूनमधून घडत असलेल्या घटना पर्यटक अधिक बेपर्वा, बेजबाबदार व बेभान बनत चालल्याचे संकेत देत आहेत. गोव्यात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, दिल्ली, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल व तामिळनाडू येथून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. गोव्यात येणारा टुरिस्ट हा हमखास सिंधुदुर्ग व कारवारला भेट देतो. कारण त्याला फेसाळत्या लाटांचा रौद्र समुद्र मोह पाडतो. त्याला शुभ्र चर्चेस आणि सुबक सुंदर मंदिरे खुणावतात. समुद्र किती अथांग आहे याची माहिती नसलेले पर्यटक अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालतात. अशीच स्थिती सह्याद्री पर्वतरांगांमध्ये साहसी पर्यटनासाठी जाणाऱ्यांची आहे.
सागरी पर्यटनाबाबत बोलायचे तर गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात गेल्या पाच वर्षांत १२५ पर्यटक समुद्रात बुडून मरण पावले. गेल्या २ वर्षांतच ५६ पर्यटक बुडाले. गोव्यासह सिंधुदुर्ग व कारवारचा विचार केला तर वार्षिक सरासरी ४० पर्यटकांना जलसमाधी मिळत असते. जिथे पोहण्यास मनाई आहे असे फलक लावण्यात आले आहेत, तिथेदेखील पर्यटक पाण्यात उतरतात आणि समुद्रस्नान करण्याचा धोका पत्करतात. पर्यटकांचे हेच वर्तन पोलिस, जीवरक्षक व पर्यटन खाते या यंत्रणांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. केरळहून आलेल्या पाच मद्यपी पर्यटकांना नुकतेच जगप्रसिद्ध कळंगुट बीचवर बुडताना जीवरक्षकांनी वाचवले. २५ ते ३० वयोगटातील हे पर्यटक उधाणलेला समुद्र पाहून बेभान झाले होते. दारू पिऊन समुद्रात उतरू नये हे ठाऊक असूनही त्यांनी पाण्यात उडी टाकली होती.
गेल्याच आठवड्यात एका पर्यटकाचा व्हिडीओ व्हायरल झाला. सागर किनाऱ्यावर जीवरक्षकांनी लावलेला सूचनाफलक या पर्यटकाने काढून हाती घेतला होता. पोहण्यास मनाई आहे असे दर्शविणारे लाल बावटे काही पर्यटक काढून हातात घेतात व फिरतात हे सर्वांसाठीच धोक्याचे आहे. महाराष्ट्र किंवा कर्नाटकच्या पर्यटकास अनेकदा वाटते की जिवाचा गोवा करणे म्हणजे कायदे, नियम धाब्यावर बसवून मस्ती करणे, थायलंडसारखे सेक्स टुरिझम कोकण किनारपट्टीत चालते, असाही चुकीचा समज देशी पर्यटकांनी करून घेतला आहे. हे पर्यटक 'इधर लडकी किधर मिलती है' असे विचारतात. यातून स्थानिकांशी त्यांचे वाद होत आहेत. गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडीओ आला आणि वाद गाजला. पर्यटक गोव्यात येवोत किंवा महाराष्ट्रात येवोत, त्या त्या भागातील परिस्थिती व संस्कृतीचा त्यांनी मान राखायला हवा. त्या प्रदेशातील लोकजीवनास अपेक्षित वर्तन व शिस्त पर्यटकांमध्ये दिसायला हवी. अन्यथा भविष्यात 'अतिथी देवो भव' असे म्हणणे स्थानिक समाज विसरून जाईल.
बीचवर चारचाकी वाहन नेण्यास सगळीकडे सक्त मनाई आहे. कारण काही ठिकाणी वाळूचे पट्टे खराब होतात तर काही ठिकाणी कासवांची अंडी नष्ट होण्याचा धोका असतो. अन्यही कारणे आहेत, पण देशी पर्यटक जीपगाड्या वगैरे बीचवर नेतात. पोलिस सातत्याने अशा पर्यटकांना दंड ठोठावत आहेत. मद्य पिऊन रिकाम्या बाटल्या बीचवर टाकणे किंवा तेथील खडकावर त्या फोडणे हा उपद्रव सिंधुदुर्ग, गोवा व कर्नाटकच्या किनारी भागात वाढला आहे. हा उपद्रव म्हणजे टूरिझमची दूसरी व काळी बाजू आहे. हे रोखावे लागेल.