पणजी : गोमंतकीय उद्योजकांना आपले तापदायी आणि अवजड उद्योग नकोसे होतात आणि हे उद्योजक मग रियल इस्टेट, हॉस्पिटेलिटी, शिक्षण, आयटी अशा क्षेत्रंमध्ये प्रवेश करतात. अलिकडे गोमंतकीय उद्योजकांनी बडी हॉटेल्स उभी करण्याच्या व्यवसायात पाऊल टाकले आहे. मात्र फोमेन्तो कंपनीने दोनापावलचे सिदादी गोवा हे आपले हॉटेल पुढील बावीस वर्षासाठी नुकतेच ताज समुहाला चालविण्यासाठी दिल्याने गोमंतकीय हॉटेल व्यवसायिकांना पंचतारांकित हॉटेल चालविणो का जड जाऊ लागले असा प्रश्न चर्चेत येऊ लागला आहे.
गोव्यातील काही बिल्डर्स व बडे उद्योगपती कळंगुट व उत्तर गोव्याच्या अन्य किनारी भागांत मोठी हॉटेल्स उभी करत आहेत. मॉडेल्स ग्रुप, साळगावकर यांचा यात समावेश आहे. पिळर्ण येथेही एक हॉटेल येईल. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने त्यास मान्यता दिली आहे. अडवलपालकर कंपनी बांबोळीत मोठे हॉटेल उभे करणार आहे. गोमंतकीय अल्कोन ग्रुपचीही हॉटेल्स आहेत. धेंपे कुटूंबातील राजेश धेंपे यांचे क्राऊन हॉटेल पणजीत दिमाखात उभे आहे.
सरकारच्या नव्या कररचनेमुळे तेथील कॅसिनो बंद झाला. श्रीनिवास धेंपे यांनी धेंपे कंपनीच्या खाणी विकल्यानंतर मग शिक्षण क्षेत्रत आपले काम वाढविले, आयटी व मनोरंजन क्षेत्रतही पाऊल टाकले. रियल इस्टेटच्या धंद्यातही कंपनीचा व्याप वाढविला गेला. साळगावकर समुहाकडून मिरामारला मेरियट हॉटेल चालविले जाते. मात्र सिदादी गोवा हॉटेल तोटय़ात नसतानाही ते हॉटेल फोमेन्तो रिसॉर्ट्स कंपनीने ताज समुहालाच चालविण्यासाठी दिल्याने वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. सिदादी गोवा हॉटेलकडे सध्या 207 खोल्या आहेत. त्यात यापुढे आणखी 300 खोल्यांची भर पडणार आहे. एखाद्या गोमंतकीय कंपनीने सुरू केलेले सिदाद दी गोवा हे पहिले बिच रिसॉर्ट आहे. मेरियट, विवांता वगैरे अनेक हॉटेल्स येण्यापूर्वी ताळगाव- बायंगिणीच्या पठारावर हे हॉटेल उभे केले गेले. त्यावेळी त्या पट्टय़ात कमी दरात संबंधितांना हॉटेलसाठी जमीन प्राप्त झाली. बायंगिणीच्या किना:यावर लोकांना जायला मिळत नाही म्हणून काही वर्षापूर्वी वाद निर्माण झाला होता पण नंतर बायंगिणीचा किनारा सर्वासाठी खुला झाला. सिदादी गोवाने 2018 सालच्या आर्थिक वर्षी 8.2 कोटींचा निव्वळ नफा कमावला. सिदादीची मालकी फोमेन्तोकडेच राहिल पण ताजचे व्यवस्थापन हे हॉटेल चालविल.
दरम्यान, फोमेन्तो रिसॉर्ट्सची ताजसोबतची भागिदारी ही दोन्ही कंपन्यांसाठी लाभदायी ठरेल व सिदादी गोवाला यापुढे अधिक ग्राहकांर्पयत पोहचता येईल, शिवाय सिदाद दी गोवाची पूर्ण क्षमता वापरात येईल असा विश्वास फोमेन्तो रिसॉर्ट्सच्या व्यवस्थापकीय संचालक अंजू तिंबलो यांनी व्यक्त केला आहे.