पणजी: जेनिटोच्या कुटुंबियांची पोलिसांकडून सतावणूक होत असल्याची तक्रार गोवा राज्य मानवाधिकार आयोगाकडे करण्यात आल्यानंतर त्याच पोलिसांना गँगस्टर जेनिटो कार्दोज शरण गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण पोलिसांपासून भिती वाटणारे न्यायालयात शरण जात असतात. सांताक्रूज टोळी युद्ध प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा ज्याच्याव पोलिसांना संशय आहे आणि गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ पोलीसांना घाबरून लपून राहिलेला जेनिटो कार्दोजची अचानक भिती निघून जाते आणि तो न्यायालया ऐवजी पोलिसांनाच शरण जातो, हा प्रकार अनेक प्रश्न उत्पन्न करणारा ठरला आहे. खुद्द पोलीस कर्मचारीच या प्रकारामुळे संभ्रमित झाले आहेत.
जेनिटो कार्दोजविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सर्वत्र शोधाशोध केली होती. विशेषत: उत्तर गोव्याचे अधीक्षक उत्कृष्ठ प्रसून हे केवळ आदेश देऊन थांबत नव्हते तर पाठपुराव्यासाठी आठवड्यातील किमान ४ दिवस तरी न चुकता जुने गोवा पोलीस स्थानकात ठिय्या मारून बसत होते. निरीक्षक श्रीकृष्ण सिनारी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या शोधकार्यात कसर राहिली नव्हती. जेनिटोच्या सिंधुदुर्ग येथील काही मित्रांनाही पोलिसांनी पकडून आणले होते. दीड दिवस चौकशी करून नंतर सोडण्यात आले होते.
हे प्रयत्न चालू असतानाच जेनिटो पणजीचे उपविभागीय पोलीस अधिकारी उत्तम राऊत देसाई यांना शरण आला. एरव्ही माद्यमांशी बोलताना परवानगी घेण्याचा आदेश उत्तर गोवा पोलिस मुख़्यालयातून सर्व अधिकाºयांना आहे, परंतु उपअधीक्षक राऊत देसाई यांनी थेट कॅमºयावर जेनिटोच्या शरणागतीची माहिती देणारी बाईट दिली.
खंडपीठाने तारीख दिली असतानाही...
जेनिटोला शोधण्यासाठी जुने गोवा पोलीस शोधाशोध करीत असतानाच पणजी सत्र न्यायालयाने जेनिटो कार्दोजच्या वतीने करण्यात आलेला अटकपूर्व जामीनसाठीचा अर्ज फेटाळला. परंतु सत्र न्यायालयाच्या आदेशाला जेनिटोच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायायाच्या गोवां खंडपीठात आव्हान दिले. या प्रकरणात खंडपीठाने पोलिसांना नोटीस बजावूुन सुनावणीही सुरू केली. पुढील सुनावणी १७ आॅगस्ट रोजी होणार होती. प्रकरण खंडपीठात असताना आणि सुनावणीची तारीख दिली असतानाच ही कथित शरणागती झाल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.