- सुशांत कुंकळयेकर
मडगाव : पतीकडून सतत चारित्र्याचा संशय घेण्यात येत असल्यामुळे डूख धरुन असलेल्या पत्नीने आपल्या अन्य तीन साथीदारांच्या सहाय्याने पतीचाच खून करुन नंतर त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची घटना मडगावपासून 22 कि.मी. अंतरावर असलेल्या कुडचडे गावात घडली. वास्तविक हा खून एक महिन्यापूर्वी झाला होता. संशयित महिलेच्या अन्य एका मैत्रिणीने एका महिन्यानंतर कुडचडेतील आणखी एका महिलेला या खुनाची माहिती दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
या प्रकरणात कुडचडे पोलिसांनी मयत बसवराज बारीकी (41) याची पत्नी कल्पना हिच्यासह तिचे मित्र सुरेशकुमार, अब्दुल करीम शेख व पंकज पवार या चौघांना अटक केली आहे. तर आणखी एक संशयित आदित्य हा फरार आहे. बुधवारी कुडचडे पोलिसांनी या चारही संशयितांना केपे न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सात दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड देण्यात आला.
अंगावर शहारे आणणारी ही घटना 2 एप्रिल रोजी घडली होती. मात्र या खुनाला वाचा तब्बल महिनाभराने म्हणजे 8 मे रोजी फुटली. कल्पना आणि तिच्या साथीदारांनी केलेला हा खून कल्पनाची मैत्रिण सीमरन हिला माहित होता. मागचा महिनाभर या खूनाच्या तणावाखाली दिवस काढल्यावर सीमरनने कुडचडे येथील एक सामाजिक कार्यकत्र्या उषा नाईक हिला या खुनाची माहिती दिली. नाईक हिने कुडचडे पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर 8 मे रोजी रात्री चारही संशयितांना अटक करण्यात आली.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, मयत बसवराज हा व्यवसायाने टॅक्सी ड्रायव्हर होता. आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने तो उत्तर गोव्यातच कायम रहायचा. त्याच्या अनुपस्थितीत त्याची पत्नी कल्पना हिचे आपल्या अन्य साथीदाराशी अनैतिक संबंध जुळले होते. याच संबंधावरुन पती-पत्नीमध्ये तणावाचे वातावरण होते.
2 एप्रिल रोजी मयत बसवराज हा कुडचडे येथील आपल्या घरी आला असता, याच अनैतिक संबंधावरुन त्याचा पत्नीशी वाद झाला. यावेळी पत्नीने आपल्या पतीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आपल्या इतर साथीदारांना घरी बोलावून घेतले. धारदार कोयत्याने मृतदेहाचे तीन तुकडे करुन नंतर एका गाडीतून ते अनमोड घाटावरील जंगलात नेऊन टाकण्यात आले. बुधवारी सकाळी कुडचडे पोलिसांनी अनमोडच्या जंगलात जाऊन विल्हेवाट लावलेल्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या खुनात वापरलेला कोयता कुडचडे पोलिसांनी जप्त केला आहे.