लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आम आदमी पक्षाची (आप) भूमिका ही बदलत असल्याचे वारंवार दिसून येते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दक्षिण गोवा जागेसाठी त्यांनी जाहीर केलेली उमेदवारीही काँग्रेससोबत चर्चा केल्यानंतर मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याची टीका प्रदेश भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
'आप' हे इंडिया अलायन्सचा भाग आहे. तरीही त्यांनी दक्षिण गोव्याची उमेदवारी बाणावलीचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस यांना जाहीर केली. तर दुसरीकडे काँग्रेसने यावर आश्चर्य व्यक्त करुन उमेदवारी बैठकीत चर्चा करुन ठरवू असे म्हटले आहे, असे वेर्णेकर म्हणाले.
'आप' नेता अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर अनेकांवर टीका केली. आपची भूमिका वारंवार बदलत असल्याचे दिसून येते, असे वेर्णेकर म्हणाले. भाजपच्या विकसित भारत उपक्रम राजकीय विरोधकांना पचत नसल्याने सध्या ते त्यावर टीका करीत आहेत.
इंडिया अलायन्समधील राजकीय पक्षांची भूमिका वेगवेगळी असल्याने राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील इंडिया अलायान्सची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. भाजप दक्षिण गोव्यासाठी उमेदवार शोध असल्याची कॉग्रेस टीका करीत असून त्यांनी अगोदर आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावे असा सल्ला वेर्णेकर यांनी दिला. यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक व प्रदेश भाजप पदाधिकारी प्रेमानंद म्हांब्रे उपस्थित होते.
करासवाडा येथे उभारणार जिल्हाभवन
राज्यातील जिल्हा पंचायतींसाठी जिल्हा भवन उभारण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी आहे. मुख्यमंत्र्यांकडे त्यासंबंधीची फाईल असून करासवाडा येथे उत्तर गोव्यासाठी जिल्हा भवन उभारण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या भवनासाठीची भू-संपादनाची प्रक्रिया बाकी असल्याचे उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक यांनी सांगितले.