- सुशांत कुंकळयेकर
मडगाव : मागच्या विधानसभा निवडणुकीत आपल्या एकूण मतांची टक्केवारी एकूण मतदानाच्या सहा टक्क्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या आम आदमी पार्टीने यावेळीही लोकसभा निवडणुकीत गोव्यातून आपले नशिब अजमावून पाहण्याचे ठरविले आहे. मात्र, चर्चच्या आहारी गेलेला पक्ष अशी आपची गोव्यात नवीन ओळख होऊ लागल्याने मागच्या निवडणुकीत त्यांना मिळालेला तेवढा पाठिंबा तरी यावेळी त्यांना परत मिळेल का, हे प्रश्र्नचिन्ह कायम आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपने गोव्यातील दोन्ही मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी दक्षिण गोवा मतदारसंघात त्यांच्या स्वाती केरकर या उमेदवाराने राजकारणात नवख्या असतानाही 11 हजाराच्या आसपास मते मिळवली होती. उत्तर गोव्यातही त्यांना अशीच मते पडली होती. मतांच्या एकूण टक्केवारीतील 3 टक्के मते त्यावेळी आपला मिळाली होती. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत आपने मोठा गाजावाजा करुन गोव्यात सगळीकडे आपले उमेदवार उभे केले होते. मात्र या पक्षाला आपल्या मतांची ङोप सहा टक्क्यांपेक्षा अधिक वर नेता आली नव्हती. अशा परिस्थितीत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाचे भवितव्य काय असा प्रश्र्न निर्माण झाला आहे.
2 ऑक्टोबरला गांधीजयंतीच्या मुहूर्तावर आपने आपले दक्षिण गोव्यातील कार्यालय मडगावात उघडून निवडणूकीला सामोरे जाण्याचे आपले इरादे स्पष्ट केले. आपच्या केंद्रीय नेत्या आतिशी मार्लेना यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले होते. यासंबंधी आपचे गोव्याचे निमंत्रक एल्वीस गोमीस यांना विचारले असता, दक्षिण गोव्यातील हे कार्यालय निवडणूक लक्षात घेऊन उघडलेले नाही. तर पक्ष कार्यासाठी उघडलेले आहे. असे जरी असले तरी येत्या लोकसभा निवडणुकीत आम्ही दोन्ही जागांवर आमचे उमेदवार उभे करु असे त्यांनी सांगितले. तर मार्लेना यांनी यावेळी बोलताना, गोव्यात राजकीय नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. आम्ही ती भरुन काढू असे वक्तव्य केले.
असे जरी असले तरी सध्या गोव्यात आप पक्ष ज्या ख्रिस्ती मतांवर आपले मनसुबे रचू पहात आहे. त्या मतदारांना कुठल्याही परिस्थितीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे. अशा परिस्थितीत ते सक्षम पर्याय म्हणून काँग्रेसकडे पहात आहेत. या परिस्थितीत आपला मते दिल्यास त्याचा फायदा भाजपाला होऊ शकेल असे गृहितक या मतदारांकडून मांडले जाण्याची शक्यता असल्याने आपला नेमका किती पाठिंबा मिळेल याबद्दल राजकीय विश्र्लेषकांमध्ये अजुनही शंका व्यक्त केली जात आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीत आप काँग्रेसकडे समजोता करणार का हाही प्रश्र्न सध्या विचारला जात आहे. यावर गोमीस यांचे उत्तर असे, अजुन तरी आमच्याकडे असा प्रस्ताव आलेला नाही. मात्र कुणाकडेही चर्चा करण्यासाठी आमची ना नाही असे ते म्हणाले.