लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पणजी शहरात इलेक्ट्रिक बसेस सुरू झाल्या तरी खासगी बसेस बंद होणार नाहीत. इलेक्ट्रिक बसेसमुळे प्रवाशांची संख्या घटणार असल्याने सरकार नुकसानभरपाई देईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. खासगी बसमालकांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीने हा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात एकूण ४८ इलेक्ट्रिक बसेस कदंब महामंडळ सुरू करणार आहे. यापैकी सहा बसेस सुरू झाल्या असून, उर्वरित टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जातील. याविषयी खासगी बसमालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर म्हणाले, पणजी व आजूबाजूच्या परिसरात सध्या ७० ते ८० खासगी बसेस विविध मार्गावर धावतात. यात पणजी ते मिरामार, दोनापावला, सांताक्रूझ, करंजाळे ताळगाव बांबोळी या मार्गाचा समावेश आहे. याशिवाय फोंडा, म्हापसा, जुने गोवे येथून पणजी मार्केटपर्यंत येणाऱ्या खासगी बसेसची संख्या २० च्या आसपास आहे. एकूणच शहरात दररोज अंदाजे १०० खासगी बसेस कार्यरत आहेत.
यावर मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक बसेस शहरात सुरू झाल्यातरी खासगी बसेस बंद करणार नसल्याचे सांगितले. मात्र या बसेसमुळे खासगी बसेसच्या प्रवाशांची संख्या घटेल, हे निश्चित. कारण इलेक्ट्रिक बसेस या वातानुकूलित असून, खासगी बसेसच्या तुलनेत तशा आरामदायी आहेत. त्यामुळे प्रवासी त्या बसेसना प्राधान्य देतील. या स्थितीत प्रवाशांची संख्या घटल्यास आमच्या व्यवसायाला आर्थिक बसेल, अशी बाजू बसमालकांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. त्यावर त्यांनी हे नुकसान भरून काढण्यासाठी नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिल्याचे ताम्हणकरांनी सांगितले.
...मग विश्वास कसा ठेवायचा?
खासगी बसमालकांना २०१८ पासूनचे इंधन अनुदान सरकारने दिलेले नाही. मग नुकसानभरपाई देण्याच्या आश्वासनावर आम्ही विश्वास कसा ठेवू, अशी विचारणा काही खासगी बसमालकांनी मुख्यमंत्र्यांसमोर केली. त्यावर इंधन अनुदानाची थकीत रक्कम जुलै अखेरपर्यंत दिली जाईल. यासंदर्भातील प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.