लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोमंतक मराठा समाजाचा इतर मागास वर्गात (ओबीसी) समावेश व्हावा यासाठी सरकार व मी स्वतः अनुकूल आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले, तसेच कायदेशीर बाबींची पडताळणी झाल्यानंतर इतरांना झळ न पोहोचता समाजाची मागणी प्राधान्याने तडीस लावली जाईल, असे आश्वासन दिले. त्यासाठी समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेतले जाईल. ही निवडणुकीतील घोषणा नसल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
गोमंतक मराठा समाज संस्थेने सोमवारी संस्थेच्या राजाराम स्मृती सभागृहात आयोजित भाऊसाहेब बांदोडकर पुण्यतिथी कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. गोवा शासनातील निवृत रोजगार आयुक्त रत्नकांत म्हार्दोळकर अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे यतीन काकोडकर, समीर काकोडकर (भाऊंचे नातू) संस्थेचे अध्यक्ष कालिदास खांडेपारकर, उपाध्यक्षा दीपाली बाणास्तरकर, सचिव उत्कर्षा बाणस्तारकर, रत्नकांत म्हार्दोळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी समाजाची इमारत कोणत्या परिस्थितीत उभी राहिली. भाऊंनी दिलेल्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला.
व्यक्तिचित्र स्पर्धेत नेहाल शेट पारकर प्रथम
या निमित्ताने भाऊसाहेबांचे व्यक्त्तिचित्र रंगविण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्यात नेहाल श्रीहरी शेट पारकर (दुर्भाट) हिने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. वास्को येथील स्मृती गोस्वामी हिने द्वितीय, आखाडा येथील साईराज रामा तारी याने तृतीय पारितोषिक पटकावले. शिरोडा येथील सुजल शिरोडकर, ताळगाव येथील सिद्धी आर. नाईक, कुंकळी येथील त्रिभुवन शर्मा, घोगळ मडगाव येथील अदिती रतिश कुंदे व खांडोळा येथील लक्ष्मण नाईक यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
राजाराम कपिलेश्वरकर यांचा सत्कार
यंदाचा भाऊसाहेब बांदोडकर स्मृती समाजभूषण पुरस्कार राजाराम चंद्रकांत कपिलेश्वरकर यांना प्राप्त झाला. मात्र, ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचे सुपुत्र हरिप्रसाद यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र व भेट असे त्याचे स्वरूप होते. यावेळी गोमंतक मराठा समाज ज्ञातीतील आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य आदी स्वरूपात राजकीय योगदान दिले, त्यांचा सत्कार करण्यात आला. श्रुती हजारे व गीतेश वेरेकर यांनी सूत्रसंचालन केले. कोषाध्यक्ष प्रभाकर मांद्रेकर यांनी आभार मानले. संस्थेच्या शतक महोत्सवांतर्गत खानेसुमारी पत्रके बाराही तालुका समिती अध्यक्षांना वितरित करण्यात आली.
भाऊसाहेब बांदोडकर पुण्यतिथी कार्यक्रम
गोव्याचे भाग्यविधाते, पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी दूरदृष्टीने गोव्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. त्यामुळेच त्या काळी बहुजन समाजातील विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले. १९४७ ते ६१ हा काळ शिक्षणाच्या दृष्टीने अवघड होता. सधन पालक मुलांना गोव्याबाहेर शिक्षणासाठी पाठवायचे, पण सर्वसामान्यांची आबाळ व्हायची, पण भाऊंनी खेडोपाडी शाळा सुरू केल्या. त्यामुळेच शिक्षणाची गंगा सर्वांपर्यंत पोहोचली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
वक्तृत्व स्पर्धा
तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आमचे प्रिय भाऊ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेतली होती. तालुका स्तरावरील विजेत्यांच्या गटात, प्रथम सात्विक दामोदर नाईक (विद्यावर्धिनी प्राथमिक शाळा, हणखणे पेडणे), द्वितीय ओवी चंद्रशेखर गावस (स. प्रा. विद्यालय, हणखणे), तृतीय - आरोही बिडकर (स. प्रा. विद्यालय, मुरगाव), उत्तेजनार्थ: पार्थ मयेकर (स.प्रा. विद्यालय, मुरगाव) व शिवांगी नीलेश नाईक (स.प्रा. विद्यालय, बांदोडा) यांनी पारितोषिके पटकावली.
दुसऱ्या गटात प्रथम पलक प्रकाश पाटणेकर (स.प्रा.थि- द्यालय, कुळे), द्वितीय नंदिता अरविद नाईक (लक्ष्मीबाई संझगिरी स्मृती विद्यालय, साखळी), तृतीय मिधांश अनय नाईक (स.प्रा. विद्यालय, कुडणे), उत्तेजनार्थ धनिष्टा विशाल घाटे (स.प्रा. विद्यालय, गुडामळा व स्वरा ऋतेश भंडारी (स.प्रा. विद्यालय, धडे सावर्डे) यांनी पारितोषिके पटकावली.