पणजी : राज्यातील रस्त्यांची स्थिती थोडी तरी सुधारायला हवी. मग आम्ही केंद्रीय मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करू. सरकारला कायदा अंमलात आणण्याची घाई नाही, असे गोव्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.केंद्रीय मोटर वाहन कायद्यातील नव्या तरतुदींची गोव्यात अजून अंमलबजावणी सुरू झालेली नाही. येत्या सोमवारपासून अंमलबजावणी सुरू होईल असे आधी वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. पण गोवा हे पर्यटन राज्य असल्याने राज्य सरकारने थोडी सावध भूमिका घेतली आहे. मंत्री गुदिन्हो यांनी विषय स्पष्ट करताना सांगितले की, केंद्रातील कायदा आम्हाला अंमलात आणावाच लागेल. त्याविषयी वेगळा विचार नाही. मात्र तो अंमलात कधी आणायचा हे ठरविण्याचा अधिकार तेवढा आमच्याकडे आहे. आम्ही कधीही अंमलबजावणी सुरू करू शकतो. पण तूर्त घाई करायची नाही असे मला वाटते. कारण गोव्यात यावेळी प्रचंड प्रमाणात पाऊस पडला. एवढा पाऊस पडेल असे कुणालाच वाटले नव्हते. या पावसाने जशी शेतीची व वीज यंत्रणोची हानी केली तशीच गोव्याच्या रस्त्यांचीही हानी केली.मंत्री गुदिन्हो म्हणाले की, गोव्यातील रस्त्यांमध्ये थोडी सुधारणा झाल्यानंतर मग आम्ही केंद्रीय मोटर वाहन कायदा अंमलात आणण्यासाठी पाऊले उचलू. रस्त्यावर खड्डे पडलेले असल्याने आम्ही कायदा अंमलात आणण्याची घाई करत नाही. शेवटी कायद्यातील तरतुदींनुसार दंडाची रक्कम मोठी असली तरी, प्रत्येकाने वाहन चालविताना नियम पाळायला हवेत. मद्य पिऊन काहीजण वाहन चालवितात. मद्यपी चालक दुसऱ्यांचे बळी घेतात. याविरुद्ध कारवाई व्हायलाच हवी. त्यामुळे योग्यवेळी आम्ही कायद्याची अंमलबजावणी सुरू करू.
रस्त्यांची स्थिती सुधारल्यावरच नवा वाहन कायदा लागू; 'या' राज्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 5:21 PM