लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'दुहेरी नागरिकत्व' हा विषय गोमंतकीयांच्या अत्यंत जवळचा विषय आहे. त्यामुळे यावर कुठलाही निर्णय घेताना गोमंतकीयांचा विचार होणे आवश्यक आहे. हा विषय लवकरात लवकर सुटला पाहिजे, यासाठी येणाऱ्या अधिवेशनात आम्ही 'दुहेरी नागरिकत्वा'साठी खासगी ठराव मांडणार आहोत. सरकारने यावरील आपले मत स्पष्ट करणे आवश्यक असल्याने हा ठराव महत्त्वाचा ठरणार आहे, असे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.
पणजीत आझाद मैदान येथे मंगळवारी प्रवासी भारतीय दिनानिमित्त 'गोवन्स फॉर गोवा' यांनी या विषयावर खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सरदेसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी आमदार कार्लस फेरेरा, अॅड. प्रतिमा कुतिन्हो, गोवन्स फॉर गोवाचे अध्यक्ष केनेडी अफोन्सो आदी उपस्थित होते.
सरदेसाई म्हणाले, केंद्रीय स्तरावर दुहेरी नागरिकत्व देणार नाही, असे थेट सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे हा विषय अद्याप संपलेला नाही. राज्य सरकारने आमची बाजू आणि गोमंतकीयांची स्थिती केंद्र सरकारपर्यंत मांडणे आवश्यक आहे. म्हणूनच हे खासगी ठराव आम्ही विधानसभेत मांडणार आहोत, असेही ते म्हणाले.