पणजी : पक्षाने जबाबदारी स्थानिक राजकारणात येण्याची माझी तयारी आहे. नशिबात असेल तर मुख्यमंत्रीपदही मिळेल, असे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.
गोवा मराठी पत्रकार संघातर्फे येथील ‘गुज’ कार्यालयात आयोजित वार्तालापात त्यांनी वरील भाष्य केले. नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असे श्रीपाद यानी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले कि, ‘मी माझी भूमिका मांडलेली आहे. परंतु त्याच बरोबर पक्ष जी काही जबाबदारी देईल ती उचलण्याची माझी तयारी आहे. उद्या स्थानिक राजकारणात उतरण्यास सांगितले तरीही उतरेन.’
‘तुम्हाला मुख्यमंत्री व्हावे असे वाटत नाही का?, या प्रश्नावर श्रीपाद म्हणाले की,‘ नशिबात असेल तर हे पद मिळेल.’ एका प्रश्नावर श्रीपाद म्हणाले की,‘ यावेळी मला केंद्रात केबिनेट मंत्रीपद मिळेल, असे लोकांना वाटले. मी केबिनेट दर्जाची वगैरे कोणतीही मागणी केली नव्हती. मोदींनी दिलेल्या राज्यमंत्रीपदावरही मी समाधानी आहे. राज्याच्या विकासाकरिता तामनारसारखे वीज प्रकल्प आवश्यक आहेत. पर्यावरण सांभाळूनही हा प्रकल्प पूर्ण करता येईल. लोकांनी अशा प्रकल्पांना विरोध करु नये.