लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : आधुनिक गोव्यात गतिशील विकासाला चालना मिळत असतानाच राज्यातील महिला स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांच्यासाठी अनेक योजना डबल इंजिन सरकार राबवत आहे. त्यामुळे आज महिला पुरुषांच्या बरोबरीने वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्याचे पाहून समाधान वाटते. प्रत्येक हाताला काम देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्यात महिला मंडळ व इतर माध्यमातून अनेक महिलांचे लघू उद्योजिका बनण्याचे स्वप्न साकारले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी मतदारसंघातील सुमारे ६७ महिलांना गृहआधार योजनेच्या मंजुरीपत्रांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, संजय नाईक, सुभाष फोंडेकर, विविध सरपंच, पंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
उद्योजक महिला मंडळानी एकत्रित यावे
साखळी मतदारसंघातील अनेक पंचायत विभागात तसेच पालिका विभागात आज महिला सबलीकरणाला चालना देताना अनेक महिला उद्योजिका बनत असून, त्याबरोबरच महिला मंडळांमार्फत एकत्रित येऊन महिला लघु उद्योजक उद्योग तसेच वेगवेगळे पदार्थ बनवि बनविण्यामध्ये रुची दाखवत आहेत. बाजारपेठेत दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने महिला आज खऱ्या अर्थाने सक्षम होत चालल्याचे समाधान मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी व्यक्त केले. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा, कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच लघुउद्योग व इतर क्षेत्रातही महिलांनी पुढे यावे, यासाठी सरकार सर्व प्रकारच्या योजना पुरविण्यास तत्पर असल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.