पणजी - गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता ऐन रंगात आली आहे. लोकसंख्या आणि विधानसभा सदस्यांच्या दृष्टीने सर्वात छोटं राज्य असलेल्या गोव्यामध्ये यावेळी भाजपा आणि काँग्रेस, मगोप या पारंपरिक प्रमुख पक्षांसोबतच आप, तृणमूल काँग्रेस हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर पक्षांतरेही सुरू आहेत. राज्यात गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपामधूनही आऊटगोईंग सुरू झालं असून, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर हेही तिकीट न मिळाल्यास भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.
मनोहर पर्रिकर यांनी गोव्यामध्ये भाजपाला स्थापित करण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे. मात्र केवळ मनोहर पर्रिकर यांचा किंवा अन्य कुणाचा मुलगा म्हणून भाजपात तिकीट मिळू शकत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे यासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा तो मी घेऊ शकत नाही. तो निर्णय आमचं पार्लामेंट्री बोर्ड आहे, ते त्यासंदर्भातील निर्णय घेईल.
दरम्यान, शरद पवार यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्यांनी आपली उंची तपासावी, त्यांच्याएवढं कर्तृत्व करावे, तेवढी उंची गाठावी, असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला होता. त्यास, प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी राऊत हे कोणाचे प्रवक्ते आहेत हे आम्हाला माहिती आहे, असे म्हटलं. तसेच, राऊत यांनीही पंतप्रधानांबद्दल बोलताना आपली उंची पाहावी, आपण बोलतो किती याचा विचार करावा, असा प्रतिटोलाही फडणवीस यांनी लगावला.