पणजी - सर्व मंत्र्यांना गेल्या शुक्रवारी जी अतिरिक्त खाती दिली गेली आहे, त्यानुसारच अधिसूचना जारी होईल. त्यात बदल केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्पष्ट केले.अतिरिक्त खात्यांविषयी मंत्र्यांमध्ये वाद असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की खाती यापूर्वीच मी दिली आहेत व त्यामुळे बदल होणार नाही. खात्यांविषयी मंत्रिमंडळ बैठकीत काही चर्चा झाली नाही. पत्रकारांनी खाण व वन खात्याविषयी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की खाण खाते माङयाकडे असल्याने मी योग्य त्या पद्धतीने खाणप्रश्न सोडवीन. वन खाते उपमुख्यमंत्री विजय सरेदसाईंना दिले गेले. ते शेवटी माङया मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. मंत्री खंवटे यांना नियोजन व सांख्यिकी खाते दिले गेले, कारण आता हे खाते मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवण्यात अर्थ नाही. आता काही राज्याची वार्षिक योजना तयार करण्याची पद्धत नाही. या खात्याने केवळ आकडेवारी काढून अर्थ खात्याला द्यायची असते.उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पत्रकारांना सांगितले की, कुणाला कोणते खाते द्यावे हे मुख्यमंत्री ठरवत असतात. तो त्यांचा अधिकार आहे. ते योग्य तो निर्णय घेतील. मला खातेप्रश्नी जास्त काही बोलण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या ताब्यात असलेल्या खात्यांना न्याय देणार आहोत. जे काही मिळालेय, त्यात आम्ही खूष आहोत. शेवटी आम्ही आता भाजपचे मंत्री आहोत आणि आम्हाला मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार मजबूत राहिलेले हवे आहे. आम्हाला स्थिर सरकार हवे आहे.
मंत्र्यांना दिलेल्या खात्यांमध्ये बदल करणार नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 4:30 PM