लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : म्हादई नदी ही गोमंतकीयांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे म्हादई वाचविण्यासाठी कसलीच तडजोड करणार नाही. भविष्यासाठी तसेच आमच्या हक्कासाठीची ही लढाई आहे. कर्नाटक राज्यात जरी काँग्रेस पक्षाचे सरकार असले तरी काहीच फरक पडत नाही, असा दावा दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केला.
येथील दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात लोकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गोव्यात केवळ २ खासदार आहेत तर कर्नाटकामध्ये २८ खासदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी म्हादईप्रश्नी दबावाखाली येऊ नये. गोव्याच्या अस्तित्वावर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न केला तर ते संपतील. तेथे काँग्रेसचे सरकार असले तरी या प्रश्नी आम्ही त्यांना कोणतेच सहकार्य करणार नाही. आम्ही म्हादई मुद्यावर कोणतीच तडजोड करणार नाही, असा इशारा खासदार फर्नांडिस यांनी दिला.
ग्रामीण भागातील रस्ते, मोबाईल नेटवर्कचा प्रश्न गंभीर आहे. मोठ्या कंपनी ग्रामीण भागात वापरकर्ते कमी असल्याने सेवा देत नाहीत. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. टॉवर उभारण्यासाठी लोकांजवळ चर्चा करून मार्ग काढला जाईल. केंद्र सरकारकडून खाजगी टेलिकॉम कंपन्याना पाठिंबा मिळाल्याने बीएसएनएल कंपनी मागे पडली आहे. गोवा शिपयार्ड एमपीटीत राज्याबाहेरच्या लोकांना नोकऱ्या देतात. त्यासंबंधी व्यवस्थापनाशी चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. गोव्याच्या युवकांना त्या कंपनीमध्ये नोकऱ्या मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. टॅक्सी चालकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार घडत असून ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत घालण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.