जायचे त्यांनी खुशाल जावे, बेशिस्त खपवून घेणार नाही; माणिकराव ठाकरे काँग्रेस नेत्यांवर भडकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 08:27 IST2025-03-22T08:26:38+5:302025-03-22T08:27:23+5:30

उठसूट काहीही बोलणे टाळण्याचा माणिकराव ठाकरेंचा सल्ला

will not tolerate indiscipline manikrao thackeray lashed out at goa congress leaders | जायचे त्यांनी खुशाल जावे, बेशिस्त खपवून घेणार नाही; माणिकराव ठाकरे काँग्रेस नेत्यांवर भडकले!

जायचे त्यांनी खुशाल जावे, बेशिस्त खपवून घेणार नाही; माणिकराव ठाकरे काँग्रेस नेत्यांवर भडकले!

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: प्रदेश काँग्रेसमधील काही नेत्यांचे वर्तन बेशिस्त आहे. आपल्याशिवाय पक्ष पुढे जाणार नाही, असे त्यांना वाटत असेल तर तो गैरसमज आहे. त्यामुळे अशा नेत्यांनी स्वतःला आवर घालत पक्षशिस्त पाळावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा गोवाकाँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिला आहे.

पणजी येथे 'नारी न्याय सन्मान समारोह' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेश महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप यांचा शपथविधी पार पडला. यावेळी अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी महिला प्रदेशाध्यक्ष बीना नाईक, गोवा सचिव डॉ. अंजली निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होत्या.

महिला काँग्रेसची संघटना मजबूत करण्यावर भर दिला जावा, ज्या महिला पूर्णवेळ पक्षासाठी काम करू शकतात, त्यांना ओळखून जबाबदारी द्यावी. ज्या महिला चांगले काम करतील, लोकांच्या समस्यांसाठी धाव घेत मदत करतील, संघटना मजबूत करण्यावर भर देतील, त्यांच्या कामाची पक्ष दखल घेणारच. त्यांचे नाव निश्चितच आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी पुढे येऊ शकते, असेही माणिकराव ठाकरे म्हणाले.

ज्यांना जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे

काँग्रेसचे काही नेते प्रवक्ते असल्याचे समजून पत्रकार परिषद घेऊन नको ती विधाने करीत आहेत. त्यांच्यावर आता कारवाई करण्याची वेळ आली आहे. कुणा एका व्यक्तीमुळे पक्ष कधीही चालत नाही. त्यामुळे ज्यांना पक्ष सोडून जायचे असेल तर त्यांनी निश्चित जावे. विधानसभा निवडणुकीला दोन वर्ष बाकी असून त्यासाठी काम करण्यासाठी शिस्त महत्त्वाची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टीएमसी, आप गोव्यात नको

तृणमूल काँग्रेस व आम आदमी पक्षाने २०२२ ची विधानसभा निवडणूक लढवल्याने काँग्रेसला या निवडणुकीत मोठा फटका बसला. त्यामुळे २०२७मध्ये ही स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी तृणमूल काँग्रेस पक्ष व आम आदमी पक्षाने गोव्यात येऊच नये, असे पक्षाच्या गोवा सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी नमूद केले.

Web Title: will not tolerate indiscipline manikrao thackeray lashed out at goa congress leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.