पणजी, दि. 27 - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यासाठी कसोटी ठरलेल्या पणजी आणि वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल उद्या सोमवारी जाहीर होणार आहेत. गोव्यातील राजकीय समीकरणे या निकालांनी बदलतील का? याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत.
निकालांबाबत राजकीय विश्लेषकांमध्येही मतभिन्नता आहे. पर्रीकर व विश्वजित हे भाजपचे दोन्ही उमेदवार किमान ५ हजारांच्या मताधिक्क्याने विजयी होतील असे विश्लेषकांच्या एका गटाला वाटते तर दुसºया गटाचे मत असे की, ‘ही पोटनिवडणूक चुरशीची झाल्याने काही सांगता येत नाही.’
पणजी मतदारसंघ हा तसे पाहिल्यास पर्रीकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु मध्यंतरीच्या काळात केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यावर काही काळ पर्रीकर गोव्यात नव्हते. त्यात भर म्हणजे सध्याचे सरकार उच्चवर्णीयांनी गैरपध्दतीने स्थापन केल्याबद्दल ख्रिस्ती तसेच बहुजन समाजाच्या मतदारांमध्ये नाराजी आहे.
घटक पक्षातील एका जबाबदार नेत्याने दिलेल्या माहितीनुसार पर्रीकर पराभूत झाले तर भाजपचा अन्य कुठलाही नेता स्वीकारुन सरकार स्थापनेचा प्रश्नच नाही. दुसºया बाजूला भाजपनेही मोर्चेबांधणी केली आहे. पर्रीकर पराभूत झाले तर पक्षाच्या एका अल्पसंख्यांक वर्गातील ज्येष्ठ नेत्याकडे नेतृत्त्व सोपविण्याची तयारी केली आहे. परंतु हा नेता आजारी असल्याने ही जबाबदारी पेलेल का असा प्रश्नही भाजपसमोर आहे.