लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'पोर्तुगीज सत्ता होती, त्याकाळी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज राजसत्तेला मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी प्रवृत्त केले होते. आजही आम्ही जुन्या ऐतिहासिक मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध आहोत. आता एक पाऊल पुढे जात गोव्यात जे ऐतिहासिक किल्ले आहेत, त्यांची आगामी काळात बांधणी केली जाईल,' अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. फर्मागुडी येथे रविवारी माहिती व प्रसिद्धी खात्याने आयोजित केलेल्या शिवजयंती समारंभात ते बोलत होते.
कृषी मंत्री रवी नाईक, वीज मंत्री सुदिन ढवळीकर, कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, सरपंच सुखानंद कृपासकर, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, नगराध्यक्ष रितेश नाईक, प्रमुख वक्ते अरुण नडके, माहिती खात्याचे संचालक दीपक बांदेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ते म्हणाले, 'शिवाजी महाराजांचा आदर्श मनामनामध्ये रुजावे म्हणून सरकार प्रयत्न करीत आहे. एवढ्या वर्षांनंतरही कोट्यवधी लोकांच्या मनात स्थान मिळवणारा एकमेव राजा म्हणजे शिवाजी महाराज. राज्य करताना त्यांनी जनता कशी सुखी राहील याचा विचार केला. आम्ही त्यांच्या पावलावर चालण्याचा प्रयत्न करत आहोत. मुघलांकडे सत्ता, संपत्ती, शस्त्रे आणि सैनिक यापैती कशाचीही कमतरता नव्हती; पण हाती शून्य असताना शिवरायांनी स्वराज्याचा ध्यास धरला. महाराजांच्या प्रभावी युद्धनीतीवर स्वराज्याचा पाया रचला गेला. महाराजांनी सातत्याने राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न केले. दक्षता आणि अलौकिक चारित्र्य या गुणामुळे छत्रपती शिवाजी महाराज आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते ठरतात.
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही गोमंतभूमी पावन झाली आहे. यंदा स्वराज्य राज्याभिषेक पूर्ण देशामध्ये साजरा केला जाणार आहे. गोव्यातसुद्धा त्यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम साजरे होणार आहेत. या वर्षाच्या बजेटमध्ये नियोजन करून फर्मागुडीचा किल्ला नव्या स्वरूपात साकारला जाईल. भाऊसाहेब बांदोडकरांचा पुतळा असेल किंवा हे मंदिर परिसर पूर्णतः नव्या स्वरूपात निर्माण करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे रणनीती, त्यांचे विचार, युद्ध कला आणि विचार हे परत एकदा आजच्या तरुण पिढीच्या समोर येणे गरजेचे आहे. त्याकरिता विद्यापीठात खास व्यसपीठ निर्माण झाले आहे.'
यावेळी बोलताना सुदिन ढवळीकर म्हणाले की, आज शिवाजी महाराजांचा विचार गोव्याच्या कानाकोपऱ्यात जात आहे. प्रत्येक तालुक्यात आज शिवजयंती समारंभ होत आहे याचे सर्व श्रेय मुख्यमंत्र्यांना जाते. फर्मागुडीचा किल्ला हा फोंड्याचे भूषण आहे. त्याचे सुशोभीकरण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आगामी काळात मुख्यमंत्र्यांनी यासाठी प्रयत्न करावे. कारण या वास्तूमुळे लोकांना प्रेरणा मिळण्यास मदत होईल.
कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, 'एक दिवस शिवजयंती साजरी करून आम्ही नक्की काय मिळवतो याचा विचार व्हायला हवा. शिवाजी महाराज म्हणजे संस्कृती व संसार संस्कारचे प्रतिबिंब आहे; परंतु आज आम्ही एका बाजूने शिवजयंती साजरी करतो व दुसऱ्या बाजूने संस्कार व संस्कृती विसरत चाललो आहोत. शिवाजी हे काही जन्माला येत नसतात तर ते घडवावे लागतात. त्यासाठी प्रत्येक घरात जिजामाता जन्माला येणे सुद्धा आवश्यक आहे. आज प्रत्येकाला शिवाजी व्हायचे आहे. जर खरेच तुम्हाला शिवाजी महाराज व्हायचे असेल तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातील शिवाजी व्हा. शिवचरित्र वाचून काढा निदान दहा टक्के जरी शिवचरित्र तुम्हाला समजले तर तुमच्यातील शिवाजी जागा व्हायला वेळ लागणार नाही.
यावेळी बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, शूरवीरांनी भारताच्या भविष्याबद्दल काही स्वप्ने बघितली होती ती पूर्ण करण्यासाठी युवकांसमोर खरे आदर्श उभे करण्याची गरज निर्माण झाली आहे. आगामी काळ हा भारताचा राहणार आहे. त्यासाठी नव्या पिढीने आव्हाने स्वीकारायला सुरुवात करायला हवी.
मोठी स्वप्ने पाहायला हवीत. जर भारताच्या नव्या पिढीने ठरवले तर काही काळातच भारत जगातील एक मोठी शक्ती म्हणून नावारूपास येईल. आगामी पंधरा वर्षांत देशाचे नेतृत्व करू शकेल, अशी प्रतिभा संपन्न युवा पिढी आमच्याकडे आहे.'
मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा चांगला पायंडा; शाह यांच्याकडून कौतुक
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'जुन्या पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करून गोवा सरकारने देशात एक चांगला पायंडा घालून दिला आहे', असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले. पुणे येथे एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले की, 'शिवाजी महाराजांनी गोव्यात पुरातन सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर त्या मंदिराचा दुसऱ्यांदा जीर्णोद्धार हा गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करीत आहेत,' असे ते म्हणाले.
नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिराचा राज्य सरकारने अलीकडेच जीर्णोद्धार केला होता. गोवा पुरातत्त्व खात्याने हे काम हाती घेतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गोवा सरकारच्या या कामाचे कौतुक केले. ऐतिहासिक सप्तकोटेस्वर मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त त्यांनी शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, राज्य सरकारने पुरातन देवळांचा जीर्णोद्धार करण्याची योजनाच आखली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"