पणजी : म्हादई नदी आमच्या हातातून निसटत आहे. राज्य सरकारकडून देखील म्हादई वाचविण्यासाठी कोणताच प्रयत्न होताना दिसत नाही. विधानसभेत जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती, या समितीची सुरुवातीला एकच बैठक झाली, त्यानंतर एकही बैठक झालेली नाही. जलस्त्रोत मंत्र्यांकडूनच या विषयात स्पष्टता दिसत नाही, असा आरोप आमदार विरेश बोरकर यांनी केला.
म्हादईवर कळसा - भांडूरा प्रकल्पाची पूर्ण तयारी कर्नाटकच्या सरकारने केली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हल्लीच पंतप्रधान नरेंद मोदी यांची भेट घेत सदर प्रकल्प घडवून आणण्यासाठी पर्यावरण मंजुरी मागीतली आहे. पंतप्रधानाचादेखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. इथे भाजप सरकार असूनदेखील म्हादई वाचविणे शक्य होत नाही, तर कर्नाटक येथे काँग्रेस सरकार असूनही त्यांना पंतप्रधान भेटत आहे. राज्यातील काँग्रेस पक्षही म्हादई वाचविण्यासाठी गंभीर नाही, अन्यथा त्यांनी कर्नाटक सरकारकडे याबाबत चर्चा केली असती. यातून सिद्ध होते की भाजप आणि काँग्रेस यांनी मिळून म्हादई कर्नाटकला विकली आहे, असे बोरकर यांनी सांगितले.
कर्नाटक हे गोव्याच्यादृष्टीने मोठे आहे, त्यामुळे स्वाभाविकरित्या म्हादई चे झुकते माप त्यांना आहे, पण लढा देणे आमचे काम आहे, आणि आम्ही लढा देत राहू. कर्नाटक आमच्यावर अन्याय करत आहे, तर आमचे सरकार केवळ विधाने करत आहेत, कृती मात्र होताना दिसत नाही. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आम्ही हा विषय अधिक प्रखरतेने मांडणार आहोत, तसेच इतर जे विषय आहेत त्यावरदेखील सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी आम्ही केली आहे, असेही बोरकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले.