लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघावर विजयी झेंडा फडकावण्यासाठी सर्व पक्षांसाठी केंद्रस्थान असलेला, तसेच सात मतदारसंघाचा समावेश असलेला हा बार्देश तालुका. रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या भाजप तसेच काँग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असली तरी मागील ५ निवडणुकीत भाजपने तालुक्यातून दाखवलेल्या सामर्थ्याला तेवढ्याच तोडीने उत्तर देण्यास तेवढाच सामर्थ्यवान उमेदवारी विरोधकातील पक्ष उतरू शकण्यास यशस्वी होईल, का, हा मुद्दा सध्या चर्चिला जात आहे.
मागील ५ निवडणुकीत बार्देश तालुका हे आपले बलस्थान असल्याचे भाजपने दाखवून दिले आहे. भाजपने दाखवलेले बळ कमी करण्यास विरोधकांकडून तोडीचा उमेदवार रिंगणात उतरवणे शक्य झाले नसल्याने त्याचा लाभ भाजपला मागील निवडणुकीत झालेला दिसतो. यावेळीही आरजी वगळता अद्याप इतर कुठल्याच पक्षाकडून उमेदवार जाहीर झाली नसली तरी भाजपचे तालुक्यातील सामर्थ्य कमी करण्यास विरोधक तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरवण्यास यशस्वी ठरल्यास तुल्यबळ लढत पाहायला मिळू शकते.
विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित मानली जात असली तरी त्यांच्या सोबत माजी मंत्री दिलीप परुळेकर तसेच माजी आमदार दयानंद सोपटे यांनी पक्षाच्या उमेदवारीसाठी दावा व्यक्त केला आहे. केलेल्या दाव्यावर पक्षाकडून लवकरच योग्य तो निर्णय घेऊन पक्षाचा उमेदवारी जाहीर केला जाईल. मात्र, श्रीपाद नाईक यांनाच उमेदवारी दिली जाणार हे निश्चित मानले जाते.
काँग्रेस पक्षाच्यावतीने ८ इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. यात सरचिटणीस विजय भिके, माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप, महेश म्हांबरे, श्रीनिवास खलप, राजेंद्र घाटे यांचा समावेश होतो; पण उमेदवारीसाठी भिके तसेच खलप हेच प्रमुख दावेदार असून त्यातील एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघावर भाजपला सतत ५ वेळा आघाडी मिळवून देणारा बार्देश तालुका सहाव्यांदा आघाडी मिळवून देणार की विधानसभेवेळी झालेला बदलाची लोकसभेत पुनरावृत्ती घडवून आणण्याचे सामर्थ्य काँग्रेस पुन्हा दाखवू शकणार हे निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.
काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांतील बहुसंख्य उमेदवारांचे तालुक्यातून म्हणावे तसे कार्य दिसून आलेले नाही. तसेच मागील ५ निवडणुकीत श्रीपाद नाईक यांचा समर्थपणे मुकाबला करणारा उमेदवार रिंगणात उतरवण्यास काँग्रेस अपयशी ठरला आहे. त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी कोणाला दिली जाते यावरही काँग्रेसचे तालुक्यातील भवितव्य ठरणार आहे.
विधानसभेवेळी आपली ताकद दाखवणारा रिव्होल्युनरी गोवन्स अर्थात आरजीचा प्रभावही म्हणावा तसा अद्यापही दिसून आलेला नाही, आरजीच्यावतीने मनोज परब यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे; पण तालुक्यातून त्यांनी आपला प्रचार सुरू केलेला नाही. विद्यमान ७ आमदारांतील ३ आमदार हे ख्रिश्चन समाजातील आहेत. २०१४ च्या तुलनेत २०१९ साली भाजपचे प्रभुत्व तालुक्यातून बरेच घटले होते. अपवाद वगळता मतांमध्येही घट झाली, घटलेल्या प्रभुत्वाचा लाभ विरोधक उठवू शकतील का हा मुख्य प्रश्न आहे.