पणजी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध पेडणे न्यायालयाने पेडणे पोलिसांनी जारी केलेली नोटीस मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती पेडणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला बुधवारी दिली.
पेडणे पोलीस ठाण्यात दि. २७ रोजी चौकशीस हजर राहण्यासाठी जारी केलेल्या नोटिशीला आव्हान देणारी याचिका केजरीवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे केली होती. या याचिकेला अनुसरून खंडपीठाने पोलिसांना नोटीस बजावली होती. ही नोटीस मागे घेतली जाणार असल्याचे पोलीसांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. त्यामुळे केजरीवाल यांची याचिका निकालात काढण्यात आली आहे.
गोवा विधानसभा निवडणूक काळात पोस्टर व रंगकाम करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या तक्रारी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याविरुद्ध गोवा निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आल्या होत्या. निवडणुकीनंतर ही प्रकरणे संबंधित पोलिस ठाण्याकडे सोपवून कार्यवाही करण्याचा आदेश आयोगाने दिला होता. केजरीवाल यांच्याविरुद्धची तक्रार पेडणे पोलिसांना सोपविण्यात आली होती.
या नोटिशीनंतर केजरीवाल यांनी पेडणे पोलिस ठाण्यात जाणार असल्याचे विधान केले होते. परंतु, नंतर नोटिशीला केजरीवाल यांनी खंडपीठात आव्हान दिले होते.