लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: गोव्याची जीवनदायिनी म्हादई ही कर्नाटककडे कशाला वळवली असा जाब भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना त्यांच्या फोंडा येथील सभेवेळी विचारणार का? असा प्रश्न कॉंग्रेस नेते विजय भिके यांनी पत्रकार परिषदेत केला.
म्हादईप्रश्नी कॉंग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केवळ शहा यांच्या सभेला हजेरी लावू नये, तर त्यांनी म्हादईसाठी आपली ताकद शाह यांना दाखवून द्यावी. म्हादईचा विषय तडीस लागेपर्यंत आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
भिके म्हणाले, 'गोव्यात पाणी समस्या अस्तित्वात असतानाच आता आमची म्हादई नदी कर्नाटकने पळवली आहे. भाजप सरकारने म्हादई वळवण्यास मंजुरी दिली. मात्र गोव्यावर अन्याय होत असतानाही भाजप सरकार शाह यांचे जंगी स्वागत करीत आहेत. म्हादई विकल्याने गोव्यात पाणी समस्या अधिकच तीव्र होणार आहे. शेतीसाठी सोडाच, पण साधे पिण्यासाठीही लोकांना पाणी मिळणार नाही. असे असतानाही भाजपचे नेते मात्र शाह यांच्या सभेच्या तयारीत गुंतले आहेत. आमची म्हादई का विकली? असा प्रश्न भाजप कार्यकर्ते शाह यांना करणार का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पक्षाचे नेते कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस म्हणाले, की म्हादई कर्नाटकला विकून गोव्यावर अन्याय केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गोव्यात येत आहेत. मात्र तरीसुद्धा भाजपचे कार्यकर्ते शांत आहेत. गोव्यात झालेल्या अन्यायाविरोधात खरे तर त्यांनी आवाज उठवण्याची गरज आहे. आमची म्हादई का विकली? याचे उत्तर शाह यांनी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सभेत विचारावे: सरदेसाई
म्हादईच्या प्रश्नावर गोवेकर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून स्पष्टतेची अपेक्षा ठेवून आहेत, रविवारी ते येतील तेव्हा म्हादईबाबत या गोष्टी स्पष्ट व्हायला हव्यात. या जाहीर सभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत व अमित शाह समोरासमोर येतील तेव्हा त्यांनी बेळगाव येथे म्हादईबाबत जे विधान केले होते ते खरे होते का, हे लोकांना कळायला हवे. बेळगाव येथील प्रचारसभेत शाह असे म्हणाले होते की, म्हादईवर प्रकल्पांसाठी कर्नाटकला डीपीआर मंजुरी गोव्याच्या सहमतीनेच दिली गेली आहे.
स्पष्टीकरण मागा : वळवईकर
गोवा दौऱ्यावर येणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे म्हादईबाबतचे स्पष्टीकरण गोव्यातील भाजप सरकारने मागावे, अशी मागणी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) गोवा नेते समील वळवईकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवून गोव्यावर अन्याय केला. मात्र, असे असूनही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोव्याचे काही मंत्री तसेच सत्ताधारी पक्षाचे आमदार कर्नाटकात गेले आहेत. यावरूनच त्यांना राज्य नव्हे तर पक्ष प्रथम असल्याचे सिध्द होते. या सर्वांचा निषेध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.वळवईकर म्हणाले, की म्हादई गोव्याची जीवनदायिनी आहे. कळसा- भांडुरा प्रकल्पाच्या नावाखाली कर्नाटकने म्हादई वळवली. हुबळी येथे झालेल्या जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे प्रमुख नेते अमित शाह यांनी म्हादई वळवण्यासाठी गोवा सरकारने कर्नाटकला परवानगी दिल्याचे विधान केले होते, तर दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गोव्याने कर्नाटकला तशी कुठलीच परवानगी दिली नसल्याचे सांगत आहेत. याचा अर्थ शाह हे म्हादईप्रश्नी खोटे बोलत असतील तर त्यावर गोवा सरकारने त्यांच्याकडून स्पष्टीकरण घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
शाह यांची फोंड्यात सभा होणार आहे. सभेत सरकारने म्हादईचा विषय शाह यांच्यासमोर मांडावा. म्हादईबाबत त्यांनी विधान का केले? यावर स्पष्टीकरण घ्यावे. भाजपने राजकीय फायद्यासाठी अन्याय केला आहे असे वळवईकर म्हणाले. यावेळी टीएमसीचे नेते जयेश शेटगावकर व तनोज अडवलपालकर हजर होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"