लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस गोव्यातील दोन्ही जागा जिंकेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केला. बंगळुरु येथून परतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लकार्जुन खरगे यांची पाटकर यांनी भेट घेतली.
पाटकर म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश संपादन केल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा आम्ही जिंकू, त्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे. कर्नाटक राज्याच्या निवडणुकीत जसे लोक आमच्या पाठीशी राहिले त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीतही लोकांचे पाठबळ मिळेल असा विश्वास वाटतो.
पाटकर म्हणाले की, नेहरूंमुळे गोवा उशिरा मुक्त झाला, असा जो आरोप भाजप करीत आहे, तो चुकीचा आहे. उलट भाजपनेच धर्म, भाषा व अन्य मुद्यांवरून लोकांमध्ये फूट पाडली. भाजपचा जुमला उघडकीस आणण्याची वेळ आली आहे. गोव्याची संस्कृती व येथील शांतता जपायची असेल तर लोकांनी आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आणायला हवेत.