मडगाव - लोकशाहीत लोकशक्ती व लोकभावनांना सर्वोच्च स्थान असते. हुकुमशाही व दडपशाहीचे राज्य जास्त काळ टिकत नाही. भाजपाचीही हुकूमशाही जास्त काळ टिकणार नाही. सध्या मणिपूर मधून बदलाचे वारे सुरू झाले आहे. लवकरच देशात ही बदलाची लाट येईल अशी प्रतिक्रिया गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या 50 व्या वाढदिवसा निमित्त शुक्रवारी मडगावात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना कामत म्हणाले, गोमंतकीय तसेच देश व संपुर्ण जगातील लोकांनी हुकुमशहांचा अंत कसा होतो हे बघीतले आहे. छत्तीसगढ, मध्य प्रदेश व राजस्थान मध्ये लोकांनी भाजपला जनादेशाने संदेश दिला होता परंतु भाजप नेतृत्वाने त्यातुन धडा घेतला नाही. मात्र आता मणिपूर मध्ये लोकांना खरे काय ते कळले आहे. पुर्वेकडुन बदलाचे वारे वाहू लागले असुन, हा बदल लवकरच पूर्ण देशात होणार आहे.
एखाद्या पक्षाच्या नेतृत्वाला ज्यावेळी आपल्या पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत नेण्यास अपयश येते त्यावेळी इतर पक्षांतील आमदार, कार्यकर्ते फोडुन ते आपला पक्ष सांभाळण्याचा प्रयत्न करतात. भाजपने आज आपली ध्येय धोरणे पायदळी तुडवली असुन, जुमला राजकारण करुन सत्ता बळकावणे हे एकमेव धोरण आज भाजपकडे आहे. काॅंग्रेस पक्ष सामान्य माणसांच्या प्रती नेहमीच संवेदनशील राहिला असुन, त्यामुळेच आमचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आम्ही साधेपणाने व रुग्णसेवेने साजरा करीत आहोत असे ते पुढे म्हणाले.
काॅंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी बोलताना गोव्यातील भाजप सरकार कोविड संकट काळातही लुटमार करण्यात व्यस्त असुन, सामान्य लोकांना दिलासा देण्यास या सरकारला पुर्ण अपयश आले आहे असे सांगीतले. काॅंग्रेस पक्षाने देशावर आलेल्या संकटाचे भान ठेऊन, साधेपणाने राहुल गांधीचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. भाजपला लोकांच्या हाल-अपेश्टांचे सोयर सुतक नसुन त्यांना केवळ राजकारण व सत्ता दिसते असा आरोप केला. आज चीनच्या सीमेवर आमच्या सैनिकांचे बलिदान जात असताना व कोविड संकटात लोकांवर उपासमारीची वेळ आलेली असताना, भाजप वर्चुअल रॅली करुन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करते हे दुर्देवी आहे.
विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कोविड संकटामुळे तसेच भाजपकडुन म्हादई प्रश्नी गोमंतकीयांचा झालेला विश्वासघात यामुळे लोकभावनेचा आदर करुन आपला ८ मार्च रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता हे भाजपवाल्यानी लक्षात ठेवावे असा टोला गिरीश चोडणकर यांनी लावला .