पणजी : आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणे कांतारा टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे अशी प्रतिक्रिया ऋषभ शेट्टी यांनी गोव्यात दिली. दरम्यान, शेट्टी यांनी अलीकडेच कांतारा या चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित प्रीक्वलची घोषणा केली होती, ज्याचे पोस्टर इफ्फी मध्ये प्रकाशित करण्यात आले.
कन्नड चित्रपट सृष्टीचे प्रतिनिधित्त्व करणारे शेट्टी यांना "कांतारा" चित्रपटासाठी गोव्यामध्ये आयोजित ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रौप्य मयूर पदक, रोख ५ लाख आणि प्रमाणपत्र असे आहे. ते कांतारा या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. हा चित्रपट इफ्फीमधील प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी यंदाच्या १५ लक्षवेधी चित्रपटांच्या यादीत स्थान मिळविणाऱ्या तीन भारतीय चित्रपटांपैकी एक होता. या १५० मिनिटे लांबीच्या कन्नड भाषेतील चित्रपटाने गेल्या वर्षी प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक आणि समीक्षकांना झपाटून सोडले आहे. सुरुवातीपासूनच हा चित्रपट दोन भागांमध्ये असावा, अशी कल्पना होती, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रेक्षक कांताराशी जोडले गेले कारण ही कथा भारताच्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे असे शेट्टी म्हणाले.