पणजी : सुविख्यात समाजशास्त्रज्ञ आणि स्व. डी. डी. कोसंबी यांच्या कन्या मीरा कोसंबी (७६) यांचे गुरुवारी पुणे येथे अल्प आजाराने निधन झाले. आपले आजोबा आणि बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक आ. धर्मानंद कोसंबी, तसेच आपले वडील इतिहासतज्ज्ञ डी. डी. कोसंबी यांच्या पावलावर पाऊल ठेवत मीरा कोसंबी यांनी भारतीय समाजशास्त्रात, विशेषत: नागरी समाजशास्त्र व महिलाविषयक संशोधनात मोलाची भर घातली आहे. मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात रिसर्च सेंटर फॉर वुमेन्स स्टडीजच्या संचालक म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी मराठी आणि इंग्रजीतून अनेक संशोधनात्मक पुस्तके लिहिली. १९व्या शतकातील सुप्रसिद्ध स्त्रीवादी कार्यकर्त्या पंडिता रमाबाई यांच्या मराठी लेखनाचे मीरा कोसंबी यांनी इंग्रजीतून केलेले भाषांतर, संकलन आणि संपादन तर चोखंदळांकडून फारच वाखाणले गेले. त्यांनी नंतर पंडिता रमाबार्इंच्या चरित्राचेही लेखन केले. गोव्यात दरवर्षी होणाऱ्या डी. डी. कोसंबी कल्पना महोत्सवातही सहभागी होत त्यांनी आपल्या वडिलांच्या योगदानाविषयी विचार मांडले होते. गतवर्षी गोव्यात इंटरनॅशनल सेंटरने आयोजित केलेल्या ‘आर्ट अॅण्ड लिटररी फेस्टिव्हल’मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या.
विदुषी मीरा कोसंबी कालवश
By admin | Published: February 27, 2015 2:09 AM