वास्को:
भिक मागून अथवा एका गाड्यावर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या रमेश चव्हाण याच्याशी एका युवकाने कीरकोळ विषयावरून वाद घालून नंतर त्याची दंडूकाने जबर मारहाण केल्याने रमेश याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.२७) पहाटे बिअर आणण्यासाठी गेल्यानंतर १९ वर्षीय पृथ्वी नंदलाल चव्हाण (रा: खारीवाडा, वास्को) यांने रमेशशी कीरकोळ विषयावरून वाद घातल्यानंतर त्याची दंडूकाने मारहाण केल्याने रमेशचा नंतर मृत्यू झाल्याची माहीती पोलीसांसमोर उघड होताच पोलीसांनी त्वरित पावले उचलून पृथ्वीला गजाआड केली. आपण रमेशची मारहाण केल्याचे पृथ्वीने पोलीसांसमोर मान्य केल्यानंतर त्याला रमेशच्या खून प्रकरणात अटक करण्यात आली.
शुक्रवारी सकाळी ८ वाजता दक्षिण गोव्यातील वास्को शहरात असलेल्या सिंडीकेट बॅक समोरच्या परिसरातील रस्त्याच्या ठीकाणी एक इसम पडून असल्याची माहीती पोलीसांना प्राप्त झाली. पोलीसांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन तपासणी केली असता रस्त्यावर पडलेला तो व्यक्ती मृत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर पोलीसांनी चौकशी केली असता त्या मृत व्यक्तीचे नाव रमेश चव्हाण (वय ३०, मूळ: महाराष्ट्रा) असून तो वास्कोत कधी कधी भिक मागून तर कधी कधी एका गाड्यावर काम करून (चहा, ओमलेट पाव इत्यादी खाद्य पदार्थांचा गाडा) उदनिर्वाह करत असल्याचे उघड झाले. पोलीसांनी त्वरित मृतदेहाचा पंचनामा करून तो शवचिकीत्सेसाठी गोमॅकॉ इस्पितळात पाठवून दिला. सुरवातीला ह्या प्रकरणात वास्को पोलीसांनी अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण नोंद केले. रमेशच्या मृतदेहावर शवचिकीत्सा केली असता त्याची मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले. रमेशचा खून झाल्याचे शवचिकीत्सक अहवालावरून समजल्यानंतर पोलीसांनी त्या दिशेने चौकशीला सुरवात केली.
चौकशीवेळी खारीवाडा येथे राहणारा पृथ्वी चव्हाण हा १९ वर्षीय युवक शुक्रवारी पहाटे ५.३० च्या सुमारास सिंडीकेट बॅक समोर असलेल्या एका बारमधून बिअर नेण्यासाठी आल्याचे पोलीसांना समजले. तेथे त्याचा आणि रमेशचा किरकोळ विषयावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर पृथ्वी ने तेथे असलेल्या एका दंडूक्याने रमेशची जबर मारहाण करून नंतर तो तेथून निघून गेल्याचे चौकशीत कळाले. रमेश याची जबर मारहाण झाल्याने नंतर त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच वास्को पोलीसांनी त्वरित कारवाई करून पृथ्वी याला गजाआड करून त्याच्याशी चौकशी केली. चौकशीवेळी आपणच रमेशची मारहाण केल्याची कबूली पृथ्वीने पोलीसांसमोर दिल्याची माहीती सूत्रांनी दिली. त्यानंतर पोलीसांनी पृथ्वी विरुद्ध भादस ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. खून प्रकरणात अटक केलेला पृथ्वी वास्को रेल्वे स्थानकाबाहेर चहा, ओमलेट पाव इत्यादी खाद्य पदार्थाचा गाडी चालवत असल्याची माहीती पोलीसांनी दिली. रमेश चव्हाण याचा खून घडण्याच्या २४ तासाच्या आत वास्को पोलीसांनी ह्या प्रकरणाचा छडा लावून खून प्रकरणातील संशयित आरोपीला अटक केले. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या खून प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.