लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजप सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीत गोव्याचा विकास कसा झपाट्याने झाला, याचा मी साक्षीदार आहे. कारण मी दहा वर्षांपूर्वीही अनेकदा गोव्यात येत होतो, असे केंद्रीय संसदीय व्यवहारमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. गोव्यात काँग्रेसचे सरकार असते, तर गोवा अविकसितच राहिला असता असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री अर्थसंकल्पाविषयी माहिती देण्यास गोव्यात आले होते. भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आपण गोव्यात अनेकवेळा येऊन गेलो आहे. अगदी लहान मुलगा होतो, तेव्हाही गोव्यात येत होतो. मंत्री बनल्यावर सातत्याने येत आहे. त्यामुळे गोव्याचा विकास मी आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे. गोव्यात साधनसुविधांचा झालेला विकास हा गोव्यातील भाजप सरकारच्या आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या काळात झाला आहे, असे त्यांनी सांगितले. विशेषतः गोव्यातील महामार्ग व पुलांचा उल्लेख त्यांनी केला.
काय म्हणाले रिजिजू?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पा- बद्दल बोलताना ते म्हणाले की, या अर्थसंकल्पाचा गोव्याला मोठा फायदा होणार आहे. मच्छीमारी उद्योग उभारी घेणार आहे. मच्छीमारी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूद फार दिलासादायक आहे, असे ते म्हणाले. गोव्याचे क्षेत्रफळ लहान असल्याचे लक्षात घेता गोव्यातील कृषिक्षेत्राला काय हवे आहे, याचा विचार करून केंद्र सरकारने योजना बनविलेल्या आहेत. शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन घेण्यासाठी जास्तीत जास्त साहाय्य देण्याची तरतूद अर्थसंकल्पात आहे, असे ते म्हणाले.