लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात एका बड्या उद्योगपतीच्या कुटूंबातील महिलेला उमेदवारी देण्याच्या हालचाली आहेत. या उद्योगपतीचा मोठा उद्योग समूह आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दक्षिण गोव्यात महिला उमेदवार मिळत नसल्याची कल्पना दिली. परंतु त्यानंतरही महिला उमेदवारालाच तिकीट दिली जावी, याबाबत भाजपचे केंद्रीय नेते ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर वरील नावाचा विचार आता स्थानिक पातळीवर चालला आहे. उद्योजक घराण्यातील या महिलेचे सामाजिक क्षेत्रातही काम आहे. तसेच ती दक्षिण गोव्याचीच असल्याचे सांगण्यात येते.
उमेदवारी देताना ती आमदार, मंत्र्याची पत्नी किंवा नातलग असू नये, असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे स्थानिक नेते पेचात अडकले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत शनिवारी दिल्लीला जाऊन आले. पक्षाने इच्छुक महिलांकडून नावे मागितली होती. काही नावे आली. परंतु निवडून येण्याची क्षमता नसल्याने या नावांबाबत विचार होऊ शकला नाही. यावेळी दक्षिण गोव्याची जागा कोणत्याही परिस्थितीत गमावू द्यायची नाही, यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर आता एका बड्या उद्योग समुहाच्या कुटूंबातील महिलेला तिकीट देण्याचे घाटत आहे.
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील एक-दोन दिवसात या महिलेसह अन्य एक ते दोन नावे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवली जातील व त्यानंतर दिल्लीहून तिसऱ्या यादीत दक्षिण गोव्याचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे उमेदवार आजही अशक्य
दरम्यान, काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज सोमवारी दिल्लीत होत आहे. मात्र तींत गोव्याचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता नाही. पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी ही शक्यता फेटाळली. ते म्हणाले की, 'गोव्याची नावे या यादीत असती तर श्रेष्ठींनी आम्हाला दिल्लीला बोलावून घेतले असते. याआधी कॉग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. आज किंवा उद्या दुसरी यादी येऊ शकते. परंतु तींत गोव्यातील उमेदवार नसतील.
दरम्यान, काँग्रेस कोणाला उमेदवारी देते याबाबत उत्कंठा आहे. कदाचित उत्तर गोव्याचाच उमेदवार आधी जाहीर होऊ शकतो. कारण दक्षिण गोव्यात फ्रान्सिस सार्दिन यांच्या नावाला विरोध करुन गोवा फॉरवर्डने कॉग्रेससमोर पेच निर्माण केलेला आहे. उत्तर गोव्यात माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांचे उमेदवारीसाठी पारडे जड आहे. नवीन चेहरा दिल्यास विजय भिकेंना संधी मिळू शकते. दक्षिण गोव्यात सार्दिन, गिरीश चोडणकर व कॅप्टन विरियातो फर्नाडिस यांच्या नावांची चर्चा आहे.
कवळेकर यांना विश्वास
दरम्यान, बाबू कवळेकर यांनी अजून तिकिटाची आशा सोडलेली नाही. 'इंडिया युती'च्या बॅनरखाली काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व एकूण पाच विरोधी पक्ष एकत्र आल्याने भाजपलाही त्याच ताकदीचा उमेदवार द्यावा लागेल, लोकसंपर्क तसेच विधानसभा निवडणुकीनंतरही संपूर्ण दक्षिण गोव्यात आपण चालू ठेवलेले काम याची दखल श्रेष्ठी घेतील, असे कवळेकर यांना वाटते.
सरदेसाईंकडून कोणाचीही तक्रार नाही : माणिकराव ठाकरे
कॉग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याशी या प्रतिनिधीने संपर्क साधून सार्दिन यांच्या नावाला गोवा फारवर्डचा विरोध आहे का? असे विचारले असता ते म्हणाले की, 'सरदेसाई यांनी माझ्याकडे कोणाबद्दलही तक्रार केलेली नाही. त्यांची माझ्याकडे जी काही बोलणी झाली, त्याबद्दल मी अधिक भाष्य करू इच्छित नाही.
ही निवडणूक माझी शेवटची : खासदार सार्दिन
मी यावेळी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी लोकांकडून होत आहे. ही माझी निवडणूक शेवटची निवडणूक असेल, असे दक्षिण गोवा लोकसभा खासदार फ्रान्सिस्को सार्दिन यांनी कुडतरी येथे आपल्या निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. कार्यक्रमात दिव्यांगांना तीन चाकी गाड्या प्रदान करण्यात आल्या. 'निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. उमेदवारीचा प्रश्न काँग्रेस पक्षाचा आहे. पुढील आठवड्यात उमेदवारांची घोषणा होईल, असे आपल्याला सांगण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.