लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: सावरधाट-धनगरवाडीतली एक महिला काल सकाळी बकऱ्या चरण्यासाठी घेऊन गेली होती. दुपारच्या सुमारास आमठाणे धरणाच्या दुसऱ्या बाजूला वडावल येथे ती पाणी पिण्यासाठी पात्रात उतरली असता मगरीने अचानक हल्ला करून तिला पाण्यात खेचून नेल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. संगीता बाबलो शिंगाडी (वय ४५) असे तिचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता नेहमीप्रमाणे काल बकऱ्या चरण्यासाठी घेऊन गेली होती. वडावल येथे ती पाणी पिण्यासाठी पात्रात उतरली असता दबा धरून बसलेल्या मगरीने तिच्यावर हल्ला केला आणि तिला पाण्यात ओढत नेले, काहीजणांना तिची आरडाओरड ऐकू येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस अग्निशमन दलाच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बोटींच्या सहाय्याने तिची शोधाशोध सुरू केली.
यावेळी डिचोली अग्निशमन दलाचे राजन परब, अनिल नाईक, महेश देसाई, विशाल वायगणकर, आर. गावस या जवानांनी शोध मोहीम राबविली. काही वेळाने त्यांना संगीताचा मृतदेह सापडला. घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पंच दिलीप वरक, संजय शेट्ये, पवन बबनराव राणे तसेच स्थानिकांनी धाव घेतली. जलसंपदा खात्याचे अधिकारी नरेश पोकळे यांनी भेट दिली.
आमठाणे धरणात साळमधून पंपिंग केलेले पाणी नियमित साठवले जाते. त्यामुळे धरणात कायम पाणी असते. धरणाच्या दुसऱ्या बाजूला लोक अंघोळीसाठी पात्रात उतरतात. त्यामुळे येथे आणखी अपघात घडण्याची भीती आहे. सरकारने याची दखल घेऊन या ठिकाणी माहिती फलक, तसेच सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी होत आहे.
दोन महिन्यांपूर्वी पतीचे निधन
संगीताच्या पतीचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे तिच्यावर तीन मुलांची जबाबदारी होती. पतीच्या निधनानंतर ती रोज बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन जात होती. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीला तोंड देत संगीता कुटुंब चालवत होती. आता आई-वडिलांच्या मृत्यूमुळे तीन मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सरकारने मुलांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी झिलू वरक यांनी केली आहे.
मदत मिळवून देणार : चंद्रकांत शेट्ये
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. सरकार दरबारी सर्व ती मदत मिळवून दिली जाणार असल्याचे सांगितले. डॉ. शेट्ये हे अमेरिकेत असून त्यांनी फोन करून दुःख व्यक्त केले. तसेच कुटुंबास तातडीने मदत देण्याचे आश्वासनही दिले.