फोंडा - महिलांकडे समाजाला समृद्धता प्राप्त करून देण्याची ताकद आहे. हे ती वेळोवेळी सिध्द करत असते.एका कुटुंबाच्या माध्यमातून महिलेचे समाजातील स्थान अधोरेखित होत असते.महिला सबल तर समाज सबल होतो , त्यामुळेच महिलांच्या सशक्ति करणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे यायला हवे. याची सुरुवात मडकई मतदार संघापासून करताना मतदार संघातील स्वयंसहाय गटातील सुमारे साडेसहा हजार महिलांचा विमा उतरवण्याचे आम्ही ठरवले आहे. अशी माहिती वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
तळावली येथे महालक्ष्मी हायस्कूलच्या पटांगणात माधवराव ढवळीकर ट्रस्ट, मगो पक्ष तसेच सेल्फ हेल्प ग्रुप फेडरेशनच्या सहकार्याने भव्य असा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. सदर मेळाव्याला उद्घाटक म्हणून डॉ. अनुपमा बोरकर, डॉ. शिरीष बोरकर, डॉ. जयश्री मडकईकर, ढवळीकर ट्रस्टचे विश्वस्त मिथिल ढवळीकर, ज्योती ढवळीकर, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, प्रिया चारी, सरपंच वसुंधरा सावंत, शैलेंद्र पणजीकर, सुखानंद कुर्पासकर, शिप्रा आडपईकर, मनुजा नाईक, सर्वेश जल्मी, यांच्या सह उपसरपंच चित्रा फडते, उज्वला नाईक, संध्या नाईक, फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा काणकोणकर, महालक्ष्मी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा वस्त आदी उपस्थित होते. सदर मेळाव्यात 1963 ते 2022 पर्यंत मडकई मतदार संघातील विविध पंचायतीत पंच सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान केलेल्या महिलांचाही सन्मान करण्यात आला.
उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना डॉ.अनुपमा बोरकर यावेळी म्हणाल्या कि, महिलांनी चांगले आरोग्य मिळविण्यासाठी भारतीय पद्धतीच्या आहाराचा अवलंब केला पाहिजे. पाश्चात्य संस्कृतीतील चविष्ट पदार्थ खाण्याच्या मोहाला वेळीच आवर घातल्यास कर्करोग सारख्या आजारापासून सुटका मिळू शकते. त्याचबरोबर स्तनपान हे प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाचे आहे. स्तनपान केल्याचे आरोग्याला अनेक फायदे होत असतात. डॉ.जयश्री मडकईकर यावेळी म्हणाल्या कि सामाजिक व कौटुंबिक जीवन जगताना महिलांना विविध भूमिका निभवाव्या लागतात. त्यातून मार्गक्रमण करत असताना महिलांना अतिरिक्त भार सोसावा लागतो. त्यामुळे प्रत्येक महिलेने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. महिला सुदृढ तर कुटुंब सुदृढ हे लक्षात ठेवा. ढवळीकर ट्रस्टचे विश्वस्त मिथिल ढवळीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले तर गोकुळदास गावडे यांनी आभार मानले.