महिला काँग्रेसची केंद्रीय हस्तकला विकास आयुक्त कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 08:35 PM2019-02-05T20:35:14+5:302019-02-05T20:35:35+5:30
चकली, चिवडा तसेच अन्य खाद्यपदार्थ बनवून स्वयंरोजगार करणा-या महिलांना केंद्रीय योजनेखाली कर्जाचा लाभ घेण्यासाठी कार्डे देण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी तसेच त्यांच्याशी गैर वागल्या प्रकरणी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील केंद्रीय हस्तकला विकास आयुक्त कार्यालयावर धडक दिली.
पणजी : चकली, चिवडा तसेच अन्य खाद्यपदार्थ बनवून स्वयंरोजगार करणा-या महिलांना केंद्रीय योजनेखाली कर्जाचा लाभ घेण्यासाठी कार्डे देण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी तसेच त्यांच्याशी गैर वागल्या प्रकरणी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील केंद्रीय हस्तकला विकास आयुक्त कार्यालयावर धडक दिली.
काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो या कार्यकर्त्यांसह येथे आल्या असता पोलिसांनी त्यांना इमारतीच्या दारातच अडविले. शहरातील वैद्य इस्पितळाच्या इमारतीत हे कार्यालय असून रघुनाथ जाधव हे तेथे आयुक्त आहेत तर रवींद्र सिंह हे प्रमुख आहेत. आयुक्तांना घेराव घालण्याच्या उद्देशाने आलेल्या महिला कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी महिला पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ‘शरम करो, शरम करो’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्यावर काही वेळाने जाधव हे स्वत:च फाइल्स घेऊन खाली उतरले आणि कार्डे कयार असल्याचे व ती आज बुधवारीच पेडणे तालुक्यात वितरित केली जातील अस सांगितले. काही अर्ज प्रलंबित आहेत तेही निकालात काढले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रतिमा कुतिन्हो या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्या की, ‘ गेले आठ महिने उत्तर गोव्यातील ५५८ महिला कारागिरांची कार्डे आयुक्तांनी अडवून ठेवली होती. या महिला विचारणा करण्यासाठी जायच्या तेव्हा त्यांच्याशी गैर वागायचा. त्यांचे वैयक्तिक फोन क्रमांक मागायचा. केंद्र सरकारच्या योजनेतून कर्जाचा लाभ केवळ कार्डधारकांनाच मिळतो त्यामुळे या गरीब महिला कारागिरांसाठी ही कार्डे महत्त्वाची आहेत. ५00 अर्ज फेटाळण्यात आले होते तसेच लांच मागण्याचे प्रकारही या कार्यालयात घडलेले आहेत. या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी आम्ही गेलो होतो परंतु इमारतीच्या दारातच आम्हाला अडविण्यात आले. या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन जाधव यांनी दिलेले आहे त्यामुळे आता आम्ही मागण्या पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहोत.’
आंदोलकांमध्ये महिला काँग्रेसच्या पणजी गटाध्यक्ष मुक्ता फोंडवेकर व अन्य महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता.