लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : फ्रान्सिस्को परेरा याने पोलिसांना क्रॉस तसेच घुमट्यांची तोडफोड केलेली तब्बल ११३ ठिकाणे दाखवली. २००० मध्ये आग्वाद कारागृहात असताना इस्रायली सहकैद्यांनी त्याचे ब्रेनवॉश केले. त्यानंतर सुटका होताच त्याने हे कृत्य केले. ओसामा बीन लादेन, सद्दाम हुसेन, वीरप्पन यांना तो आदर्श मानतो. २००३ पासून फ्रान्सिस्को याने केलेल्या तोडफोडीबाबत पोलीस पुरावे गोळा करीत आहेत. गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर तसेच कॉँग्रेस आमदार प्रतापसिंग राणे यांच्या लक्षवेधी सूचनेवर ही माहिती दिली. क्रॉस, घुमट्या आदी धर्मस्थळांमध्ये सैतानाचा वावर असतो. तेथे प्रार्थना, पूजन करू नये. उलट तेथील सैतानाच्या आत्म्यांना मुक्त करावे, असे इस्रायली कैद्यांनी तो आग्वाद तुरुंगात असताना त्याच्या डोक्यात भरले, अशी माहिती त्याच्या जबाबावरून पुढे आली आहे. तोडफोडीचे काम हे त्याचे एकट्याचेच असल्याचे आतापर्यंतच्या तपासात दिसून येते. फ्रान्सिस्को याने घरातील क्रॉस, मूर्तीही काढून टाकल्या. त्याच्या खात्यात २२ लाख रुपये कायम ठेव आढळून आल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात होते; परंतु असे निष्पन्न झाले आहे की, फ्रान्सिस्कोच्या वडिलांची जमीन होती. ती विकून २५ लाख आले. त्यातील तीन-चार वाट्यांचे हे पैसे आहेत. तो रात्रीच्या वेळी विमानतळावर प्रवाशांना पोहोचवायचा. दिवशी दोन हजार रुपये त्याची कमाई होती. १४ वर्षांत त्याने हे कृत्य केले आहे. तो वापरत असलेला हातोडा ५ किलो वजनाचा आहे. फर्मागुडी येथील शिवाजी महाराजांचा पुतळा फोडण्याचेही प्रयत्न त्याने केले होते. तथापि पुतळा कास्याचा असल्याने त्याला शक्य झाले नाही. सांगे येथील पाईक देवस्थानमध्येसुद्धा त्याने तोडफोडीचा प्रयत्न केला. पणजीचा आबे द फारिया पुतळाही त्याचे लक्ष्य होते.
तोडफोडीचे काम एकट्याचेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 2:18 AM