पणजी : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम गोव्यात पूर्णपणे ठप्प झाले आहे. गेले सात महिने पक्षाची एक देखील बैठक झालेली नाही आणि पक्षाचे कुणीच निरीक्षकही गोव्यात आलेले नाही. पवार यांनी बारा वर्षांपूर्वी गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा सुरू केली होती. गोव्याचे माजी मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसोझा यांच्याकडे पवार यांनी राष्ट्रवादीची धुरा सोपवली होती. गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढावा असा प्रयत्न प्रारंभी पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी केला. पटेल हे गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी होते. प्रारंभी काँग्रेस पक्षासोबत युती करून राष्ट्रवादी काँग्रेस हा गोव्यात सत्तेचाही वाटेकरी झाला. राष्ट्रवादीचे गोवा विधानसभेत दोन किंवा तीन आमदार कायम असत होते आणि सरकारमध्येही दोघांना मंत्रीपदे मिळायची.
गेल्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि अन्य सगळे उमेदवार हरले. एकटे चर्चिल आलेमाव हे स्वत:च्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आले. मात्र चर्चिल आता फक्त तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीसोबत आहेत. प्रत्यक्षात ते भाजपप्रणीत आघाडी सरकारच्या सर्व निर्णयांना पाठींबा देत आहेत.
फेब्रुवारीतील निवडणुकीत गोव्यात काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत युती केली नव्हती. एकेकाळी विल्फ्रेड डिसोझा, मिकी पाशेको, नीलकंठ हलर्णकर, जुझे फिलीप डिसोझा असे आमदार व मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आता. राष्ट्रवादीकडे गोव्यात धड राज्य कार्यकारिणीही राहिलेली नाही व पदाधिकारीही नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पणजीतील कार्यालयात कुणीच कार्यकर्ते येत नाहीत. आमदार झाल्यानंतर आलेमाव यांनी कार्यालयात पाऊलही ठेवलेले नाही.
पवार आणि पटेल यांना गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काम वाढविण्यात आता मोठासा रस राहिलेला नाही अशी कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. गेल्या निवडणुकीत बहुतांश पदाधिकारी पक्षाला सोडून गेले. आता फक्त प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा आणि दोन-तीन पदाधिकारी शिल्लक आहेत.