लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : जानेवारी २०२४ पर्यंत ५० बंधाऱ्यांची कामे हाती घेतली जाणार असून त्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत निविदा जारी केली जाणार आहे, अशी माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
सचिवालयातील एका कार्यक्रमावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. जलस्रोत खात्याने जलसंवर्धनाचा पुढाकार घेतला असून राज्यात १०० बंधारे बांधण्याचा मानस आहे. जलस्रोत मंत्र्यांनी सांगितल्यानुसार, येत्या पावसाळ्यापूर्वी ६० ते ७० बंधारे बांधून पूर्ण होणार आहेत. यामुळे लोकांची पिण्याचा पाण्याची समस्या सुटणार आहे. पुढील तीन महिने कामाची निविदा जारी केली जाणार आहे. त्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत कामाला सुरुवात केली जाणार आहे, असे मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले.
दरम्यान, बंधारे बांधणे हे आवश्यक आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पण काहीजण याला विरोध करत आहेत. प्रत्येक विकास कामाला लोकांनी विरोध करू नये. बंधारे बांधण्यासाठी आम्ही स्थानिक पातळीवरील लोकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. पाण्याचा समस्या सोडविण्यासाठी बंधारे बांधणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण याला विरोध करू नये. ज्या ठिकाणी खरोखरच पर्यावरणाची समस्या उद्भवत आहे तिथे सरकार पर्यायी व्यवस्था करते, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतीला योग्य प्रमाणात पाणी मिळायला हवे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकल्पांचे काम मार्गी लावले जात आहे. बंधारे प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. राज्यात येत्या काळात जास्तीत जास्त बंधारे बांधून पाण्याचे संवर्धन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी गोमंतकीयांनी सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. प्रत्येकवेळी वस्तूस्थिती न जाणून घेता प्रकल्पांना विरोध करणे टाळले पाहिजे. विरोधकांकडून कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता प्रकल्पांच्या कामात आडकाठी आणली जात असल्याचा आरोपही यावेळी मंत्री शिरोडकर यांनी केला.
शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी पैसे
शेतकऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे, त्यांना चतुर्थीपूर्वी पैसे दिले जाणार असल्याचे आश्वासन मंत्री शिरोडकर यांनी दिले आहे. यामुळे सर्व शेतकन्यांचे पैसे चतुर्थीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. तसेच कामधेनू योजनेविषयी गावागावात मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी आम्ही या योजनांविषयी प्रचार प्रसार करणार आहे, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.