लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : वास्को शहरात नवीन मासळी मार्केट इमारत प्रकल्प बांधण्याचे काम सुरू आहे. सोमवारी (दि.८) प्रकल्पस्थळी काम करताना एका कामगाराला विजेचा जबर धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. उमाशंकर प्रल्हाद काटा (वय २८, मूळ ओडीशा) असे त्याचे नाव आहे.इमारतीच्या भूमीगत मजल्यावर पाण्याचा पंप दुसऱ्या ठिकाणी हलवण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा पाय जिवंत वीज वाहिनीवर पडल्याने विजेचा धक्का बसला. इतर कामगारांनी त्याला तातडीने चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. मात्र इस्पितळात पोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. उमाशंकर वास्कोतील नवीन मासळी मार्केट प्रकल्पाच्या भूमीगत मजल्यावर काम करत होता. तेथील पाण्याचा पंप एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी त्याचा पाय एका जिवंत वीज वाहिनीवर पडला व विजेचा तीव्र धक्का बसून तो खाली कोसळला.
वास्को पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. तसेच त्याचा मृतदेह मडगाव जिल्हा इस्पितळाच्या शवगृहात पाठवण्यात आला आहे. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयुर सावंत अधिक तपास करित आहेत.