पणजी : कला अकादमीच्या कारभारावर गोवा कला आणि संस्कृती खात्याच्या मंत्र्यांकडून कडक ताशेरे ओढलेत. मागील दोन महिन्यांत कला अकादमीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या अवास्तव खर्चाच्या प्रवासाची फाईल नकारात्मक शेरा मारून परत पाठविली आहे. कला अकादमीच्या अधिकाऱ्यांच्या प्रवास वाऱ्यांना चाप देणारा झटका कला संस्कृती मंत्र्यांच्या कार्यालयातून दिला आहे. मंजुरीसाठी पाठविलेल्या प्रस्तावाच्या फाईल्स नकारात्मक शेऱ्यासह परत आल्या आहेत. कला अकादमीच्याच एका अधिकाऱ्याकडून नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर ही माहिती दिली, तर कला आणि संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या कार्यालयातून त्याला पुष्टी देण्यात आली. कला अकादमीच्या काही अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांत चार दौरे केले होते. त्यात दोन दौरे दिल्ली येथे तर एक दौरा ओडिशा राज्यात केला होता. गंभीर बाब अशी की दिल्लीचा दौरा हा एकाच कारणासाठी दोन वेळा केला होता. दिल्ली येथील गुडगाव थिएटर पाहण्यासाठी त्यांनी तो दौरा केला होता. पहिला दौरा २६ जानेवारी रोजी केला होता. नंतर दोन महिने उलटण्यापूर्वीच पुन्हा दिल्लीत आणि ओडिशा येथे दौरा केला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये पुणे दौऱ्यासाठी जेव्हा प्रस्ताव पाठविला तेव्हा त्याची गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून मनधरणी करून पुणे दौऱ्याला मंजुरी मिळवली. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी विष्णू वाघ यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
कला अकादमीच्या कारभारावर ताशेरे
By admin | Published: April 18, 2016 2:10 AM