पणजी : बिठ्ठोण येथे जागतिक दर्जाचे मरिटाइम इन्स्टिट्यूट येणार असून १८ ते २0 अभ्यासक्रम तेथे उपलब्ध केले जातील. आखातात जहाजांवर नोकरीसाठी जाणा-यांना तसेच हॉटेल आदी सेवा क्षेत्रात काम करु इच्छिणा-यांना सर्टिफिकेटसाठी मुंबई किंवा बंगळुरुला जावे लागणार नाही. बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी ही माहिती दिली. मायकल लोबो म्हणाले की, 'सध्या गोमंतकीय तरुणांना अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी मुंबई, बंगळुरुला जावे लागते. वर्षाकाठी १५00 विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, अशी व्यवस्था या ठिकाणी असणार आहे.'गोव्यातील अनेक तरुण आखातात जहाजांवर खलाशी म्हणून काम करतात. केवळ खलाशासाठी लागणारे प्रशिक्षणच नव्हे तर आग विझविणे, हाऊस किपिंग, बार टेंडरिंग आदी अभ्यासक्रमही येथे असतील. जेणेकरुन केवळ जहाजांवरच नव्हे, तर हॉटेल्स तसेच सेवा क्षेत्रातील अन्य आस्थापनांमध्येही येथे प्रशिक्षण घेतलेले युवक, युवती काम करु शकतील. सध्या अशा अभ्यासक्रमांसाठी परदेशात मोठा खर्च करावा लागतो. गोव्यात खास करुन सासष्टी तालुक्यात ख्रिस्ती बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण आखातात जहाजांवर खलाशी म्हणून नोकरीला आहेत.
बिठ्ठोणमध्ये जागतिक दर्जाचे मरिटाइम इन्स्टिट्यूट, मायकल लोबो यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 9:53 PM