पणजी : जागतिक योग परिषद यावर्षी प्रथमच गोव्यात होणार आहे. त्यानिमित्ताने जगभरातून योग प्रशिक्षक व तज्ज्ञ गोव्यात येतील. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात ही परिषद होईल. केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एरव्ही जागतिक योग परिषद ही दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये होत असे. मात्र यावेळी आयोजनाचा मान गोव्याला मिळेल, असे नाईक म्हणाले.
गोव्यात यापूर्वी डिफेन्स एक्सपो आणि अन्य मोठे उपक्रम झाले व त्याचा लाभ गोव्याला मिळाला. धारगळ येथे राष्ट्रीय आयुव्रेद व योगा आणि नॅचरोपथी अशा दोन संस्था एकाच मोठय़ा प्रकल्पात उभ्या राहतील. त्यासाठी दोन लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा येत्या पंधरा दिवसांत केंद्र सरकारच्या ताब्यात येईल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. केंद्र सरकार यावर एक हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. ताळगाव येथे जलक्रिडा संस्था प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले आहे. फर्मागुडीत हॉटेल मॅनेजमेन्ट संस्थेचे काम सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्राकडून 30 हजार कोटी
गेल्या चार वर्षात गोव्यात विविध प्रकारची विकास कामे करण्यासाठी केंद्राकडून 3क् हजार कोटींचे अर्थसाह्य मिळाल्याचा दावा मंत्री नाईक यांनी केला. दहा हजार कोटींचे पुल, रस्ते, महामार्ग रुंदीकरण अशी कामे सुरू आहेत. दक्षिण गोव्यातील साळ नदी उसपून स्वच्छ करण्यासाठी केंद्राने 60 कोटी रुपये दिले. मांडवी पुलावरील खर्चासाठी चारशे कोटी रुपये दिले. उत्तर व दक्षिण गोव्यात स्वदेश दर्शन योजनेखाली पर्यटन विकासाकरीता केंद्र सरकारने एकूण दोनशे कोटी रुपये दिले. स्मार्ट सिटीसाठी पणजीला 5क्क् कोटी रुपये दिले. धारगळच्या आयुव्रेदा संस्थेवर एक हजार कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करील. सध्या पाचशे कोटी रुपये दिले आहेत. त्याशिवाय दोन जिल्हा इस्पितळांसाठी केंद्र सरकार निधी देत आहे, असे नाईक यांनी सांगितले. वीज क्षेत्रात सुधारणांसाठी 8क्क् कोटींचे सॉफ्ट लोन केंद्राने दिल्याचे ते म्हणाले.
केंद्रातील मोदी सरकारने चार वर्षाचा कालावधी शनिवारी पूर्ण केला. देशात सरकारने 7.25 कोटी शौचालये बांधली. 80 टक्के गाव हागणदारीमुक्त केले. अनुसूचित जाती,जमाती व ओबीसींसाठी केंद्राने अर्थसाह्य वाढवले. प्रधानमंत्री उज्वल योजनेखाली चार कोटी वीज कनेक्शने गरीबांना दिली गेली, असे नाईक म्हणाले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.