पणजी : सांतआंद्रे व कुठ्ठाळी अशा दोन विधानसभा मतदारसंघांत मरिना प्रकल्प उभे करण्यासाठी मुरगाव पोर्ट ट्रस्ट (एमपीटी) व चौगुले कंपनीला सहाय्य करण्याची सरकारची तयारी असली तरी या प्रकल्पांविरुद्ध सरकारमध्येच असंतोष निर्माण झाला आहे. भाजपचे आमदार विष्णू वाघ व मंत्री एलिना साल्ढाणा यांनीच असंतोषाचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे मरिना प्रकल्पांचे प्रस्ताव गुंडाळण्याकडे सरकारचा कल आहे. सांतआंद्रे व कुठ्ठाळीनंतर सांताक्रुझ मतदारसंघातही मरिना प्रकल्पांविरुद्ध असंतोषाचे वारे आहे. तेथेही आंदोलकांनी बैठकांचे नियोजन केले आहे. भाजपचे आमदार वाघ यांनी तर त्यांच्या सांतआंद्रे मतदारसंघात मरिनाविरुद्ध लोकचळवळच सुरू केली आहे. सांतआंद्रेत वाघ यांच्याकडून, तर कुठ्ठाळीत मंत्री साल्ढाणा यांच्या समर्थकांकडून मरिनाविरुद्ध बैठकांचे आयोजन केले आहे. सांतआंद्रे, कुठ्ठाळीच्या किनारपट्टी भागात मच्छीमार आणि एसटी समाज मरिनांविरुद्ध संघटित होऊ लागला आहे. सरकारला या असंतोषाची कल्पना प्रथम साल्ढाणा यांनी दिली होती. आता वाघ यांनीही सरकारला ही जाणीव करून दिली आहे. आम्ही मरिना प्रकल्पांना यापूर्वी केवळ तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यांना पर्यावरणविषयक दाखला, प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता हे सारे मिळवावे लागेल. ते मिळाले नाही किंवा लोकांनी प्रखर विरोध केला तर मरिनांना आम्ही मान्यता देऊ शकणार नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही गेल्या पंधरवड्यात भाजपच्या बैठकीत वाघांसमोर सांगितले आहे. तथापि, जे प्रकल्प प्रदूषण करत नाहीत, अशा प्रकल्पांचे गोव्यात स्वागत करायला हवे, अशीही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. पार्सेकर यांनी ती यापूर्वी जाहीरपणे मांडलीही आहे. (खास प्रतिनिधी)
मरिना गुंडाळणार
By admin | Published: May 22, 2015 2:26 AM