लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : एखादा लेखक वाढू शकतो, मात्र त्यासाठी त्याने समकालीन राहायला हवे. त्याचप्रमाणे काळाच्या प्रवाहाबरोबर राहणेही गरजेचे आहे तसेच भरपूर वाचन करायला हवे, असे मत ज्ञानपीठ पुरस्कारविजेते प्रख्यात कोकणी लेखक दामोदर मावजो यांनी मंगळवारी व्यक्त केले. कोकणी भाषा मंडळाने मडगाव रवींद्र भवनात जागतिक मातृभाषा दिनानिमित साहित्यिकांशी संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात ते बोलत होते.
कोकणी भाषेला समजून घेणे खूप गरजेचे असून वाचन हे बंद होता कामा नये, असा सल्ला मावजो यांनी यावेळी दिला. मुंबईत पोहोचल्यानंतर आपला दृष्टिकोन बदलला. तिथे आपल्याला विविधता समजली. मुंबईने आपल्याला शहाणे केले असे म्हणता येईल, असे त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले.
जेव्हा एखादा प्रकल्प घेता तेव्हा गावात जाऊन तेथील लोकांच्या भाषेचा अभ्यास करा. त्यांचे मार्गदर्शन व विचार घेऊन कोकणी भाषेला समृद्ध बनवा, असे आवाहन मावजो यांनी केले. गावातील पूर्वीचा पोसरो (दुकान) ही समाजाला सेवा देणारी एक जणू संस्थाच होती. गावचे लोक है आपल्याला साहित्य लिहिताना खूप उपयुक्त ठरले. लोकांसोबत संबंध सदैव चांगले राहिले. दुकान चांगले चालले, म्हणून आपण लेखक बनू शकलो, असे मावजो म्हणाले. यावेळी तन्वी कामत आणि ब्रिजेश देसाई यांनी दामोदर मावजो व महाबळेश्वर सैल या दोन्ही साहित्यिकांशी संवाद साधला.
- गोव्याबाहेरचे वाचक अनुवादाच्या माध्यमातून आपले साहित्य वाचतात हे आपल्याला माहीत आहे. मात्र गोव्यात आमचे साहित्य वाचलेले फारसे लोक भेटत नाहीत. त्यामुळे कोकणी साहित्याचे वाचन करावे असे आपल्याला सांगावेसे वाटते, असे मावजो म्हणाले.
- सर्जनशील लिखाण आपण कोकणी भाषेतूनच करतो. कारण कोकणी भाषेत लिहिताना आपली लेखणी फुलते. गोव्याबाहेरच्या लोकांसाठी इंग्रजीतून लिहाये लागते, असे त्यांनी सांगितले.
- प्रत्येक भाषेची शैली असते आणि बोलीभाषेमुळे आमची भाषा समृद्ध होते, असे ते म्हणाले.
लष्करी सेवा, शेतकरी पार्श्वभूमी उपयोगी पडली सैल
लष्करात सेवा बजावताना आलेले अनुभव तसेच आपली शेतकऱ्याची पार्श्वभूमी ही आपल्याला साहित्य लिहिताना खूप उपयोगी पडली, असे सरस्वती पुरस्कारविजेते कोकणी लेखक महाबळेश्वर सैल यांनी जागतिक मातृभाषा दिनानिमित्त आयोजित संवाद कार्यक्रमात बोलताना सांगितले. पुरस्कार हा एक मोलाचा टप्पा आहे. पण पुरस्कार मिळाला म्हणून आपण खूप मोठे झालो असे कधी वाटले नाही. सदर पुरस्कार मिळण्यामागे त्याग, संघर्ष आणि त्रास आहेत. म्हणून ४० वर्षानंतर सदर पुरस्कार मिळाला आणि तो सहजासहजी मिळाला नाही, असे सैल यांनी सांगितले.
एक लेखक म्हणून स्वतःचा विकास करणे तसेच विविध प्रकारची माहिती समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. साहित्याचे बीज रुजलेलेच होते. त्यानंतर आपण पुढे साहित्यिक व्हायला हवे असे ठरवले आणि अभिमानाने, आत्मविश्वासाने साहित्यिक म्हणून प्रवास केलेला आहे. ललित साहित्य लिहिताना बोलीभाषेतून लिखाण सहज घडून आले. त्यामुळे आपल्या साहित्यात एक प्रकारचा मूलभूतपणा असतो आणि ते पाहून खूप बरे वाटते, असे त्यांनी सांगितले. आजची तरुण पिढी का लिहीत नाही, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बुद्धिमान लोक आता साहित्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत असा संशय आपल्याला येतो, असे सैल पुढे म्हणाले, साहित्य सतत वाचत राहायला हवे. यातून फायदा होतो, असे ते म्हणाले.
अस्मिता समृद्ध करण्याचा प्रथम विचार व्हावा
कोकणी ही आपली मातृभाषा असून आपली अस्मिता समृद्ध करण्याचा प्रथम विचार व्हायला हवा. तरुण पिढीने आपला दृष्टिकोन व्यापक करायला हवा त्याचप्रमाणे कोकणी शब्दसंग्रह विस्तृत करायला हवा. कोकणी साहित्य पुढे नेण्याचे काम तरुण पिढीने करायला हवे, असे मत याप्रसंगी सैल यांनी व्यक्त केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"