वासूदेव पागी, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: वर्ष २०२४ हे गोव्यासाठी जसे अनेक यश आणि योगदानाचे ठरले त्याचप्रमाणे काही दुर्दैवी वाईट घटनांचे साक्षीदारही ठरले आहे. त्यात सूचना सेट, नोकरीकांड आणि सुलेमान खान पलायन प्रकरणात फितुरी या धक्कादायक घटनांचा समावेश आहे.
२०२४ ची सुरुवातच झाली ती सूचना सेठ नामक बंगळूरच्या सीईओ हिच्या अत्यंत घनास्पद कृत्याने. ती गोव्यात सहलीसाठी आली तेव्हा स्वतःच्या चार वर्षे वयाच्या मुलाची हत्या करून तिचा मृतदेह बॅगमध्ये घालून बंगलोरला जाताना पकडली गेली. अशा प्रकारची घटना राज्यात यापूर्वी कधीच घडली नव्हती. या घटनेत आई स्वतःच्या कोवळ्या मुलाचा बळी घेते. नवरा बायकोच्या भांडणात या कोवळ्या मुलाचा बळी गेला होता. आणखी एका राज्यव्यापी घटना मालिकेमुळे हे वर्ष गोव्यासाठी खूपच वाईट गेले. नोकरी विक्री प्रकरण (नोकरीकांड) गोव्यात उघडकीस आले. या प्रकरणात नोकऱ्या विक्रीसाठी पैसे घेण्याचे प्रकार घडले. वास्तविक नोकरी विक्री हा गुन्हा आहे. परंतु त्यातही नोकऱ्या न देताच लाखो रुपये हडप करण्याचे प्रकार उघडकीस आले आणि या घटनेचे पडसाद गोव्यापासून दिल्लीपर्यंत उमटले. शंभराहून अधिक लोकांवर या प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
दरम्यान, सुलेमान खान पोलिसांच्या कोठडीतून पळणे ही धक्कादायक गोष्ट नाही. कारण यापूर्वी खुद्द तुरुंगातूनही कैदी पळालेले आहे. परंतु पोलीसच फितूर होऊन कैद्याला लॉकपमधून बाहेर कढून सुटका करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.
सर्वाधिक चर्चा
गोवापोलिसांच्या इतिहासातील काळा दिवस ज्याला म्हणू शकतो अशी कुख्यात गुन्हेगार सिद्दिकी उर्फ सुलेमान खानला गुन्हे शाखेच्या कोठडीत असताना एका पोलिसांने फितूर होऊन लॉकअप मधून सोडविले आणि कर्नाटकात नेऊन सोडले. हे घटना ताजी असल्यामुळे या प्रकरणात अजूनही धरपकड सुरू, चौकशीही सुरू आहे. आरआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक सुलेमानच्या आमिषाला बळी पडला. तीन कोटी देतो असे त्याला सुलेमानने सांगितले होते. अमितला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. असा प्रकार गोवा पोलिसांच्या कारकीर्दीत कधीच घडला नव्हता.